महाराष्ट्रात सध्या दोन पक्षांमधल्या चार गटामध्ये पक्ष नेमका कुणाचा? यावर दावे-प्रतिदावे चालू आहेत. एकीकडे शिवसेनेतल्या दोन गटांचा वाद गेल्या दीड वर्षांपासून चालू आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या दोन गटांमधला वाद गेल्या तीन महिन्यांपासून चालू असून त्यावर आता निवडणूक आयोगासमोर सुनावणी होत आहे. वर्षभरापूर्वी जशी सुनावणी शिवसेनेतील दोन गटांबाबत झाली, तशीच सुनावणी आता राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या दोन गटांबाबत होत. आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक भावनिक पोस्ट एक्सवर (ट्विटर) केली आहे.
सुनावणीचा पहिला दिवस…
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व चिन्ह कुणाचं? या वादावर शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोगासमोर पहिली सुनावणी पार पडली. यामध्ये दोन्ही बाजूच्या वकिलांनी आपापला पक्ष समोर ठेवल्यानंतर पुढील सुनावणी सोमवारी संध्याकाळी ४ वाजता होणार असल्याचं निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलं आहे. शरद पवार गटाकडून अभिषेक मनु सिंघवी बाजू मांडत आहेत तर अजित पवार गटाकडून देवदत्त कामत बाजू मांडत आहेत.
“मी बेकायदेशीर? मग माझ्या सहीच्या एबी फॉर्मवर…”, जयंत पाटलांचा अजित पवार गटाला टोला…
“सर्वात दुर्दैवी बाब म्हणजे…”
दरम्यान, शुक्रवारी झालेल्या सुनावणीवरच रात्री उशीरा जितेंद्र आव्हाडांनी एक्सवर पोस्ट केली आहे. “आजची सुनावणी दोन तास चालली. शरद पवार निवडणूक आयोगाच्या कार्यालयात या सुनावणीसाठी दोन तास बसून होते. हे सगळं पाहाणं फारच वेदनादायी होतं. सर्वात दुर्दैवी बाब म्हणजे अजित पवार गटाच्या वकिलांनी आपल्या युक्तीवादात म्हटलं की शरद पवार पक्ष अलोकशाही पद्धतीने चालवतात, जणूकाही ती त्यांची जहागीर आहे. हे ऐकून माझ्या डोळ्यांत पाणी उभं राहिलं”, असं जितेंद्र आव्हाडांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
“ज्यांना सर्वात खुल्या मनाच्या आणि सर्वाधिक लोकशाही पद्धतीने वागणाऱ्या शरद पवारांसारख्या नेत्याकडून शक्य ते सर्व फायदे मिळाले, ते असा काही आरोप करत होते ज्यावर शरद पवारांचे राजकीय शत्रूही सहमत होणार नाहीत”, असंही जितेंद्र आव्हाडांनी आपल्या पोस्टमध्ये शेवटी म्हटलं आहे.
“देवेंद्रभाऊ शिंदे व अजित पवारांना नाचवत त्यांचे डमरू..”, ठाकरे गटाचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल!
आक्षेप काय?
२ जुलै रोजी अजित पवारांनी सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, ३० जून रोजीच त्यांची पक्षाच्या अध्यक्षपदी कार्यकारिणीकडून निवड करण्यात आल्याचा दावा त्यांच्या गटाने केला आहे. तर दुसरीकडे ३० जूनला निवड झाली, तर १ जुलै रोजी अजित पवार गटाचे नेते शरद पवारच अध्यक्ष असल्याचं का म्हणत होते? शपथविधीनंतरच्या पत्रकार परिषदेत शरद पवारच अध्यक्ष असल्याचं का म्हणत होते? असा सवाल शरद पवार गटाकडून उपस्थित करण्यात आला आहे.