Somnath Suryavanshi Postmortem Report : परभणीत १० डिसेंबर रोजी संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आल्यानंतर तिथे मोठा हिंसाचार घडला. या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले. याची चर्चा आता विधानसभेतही घडली. या घनटेत पोलिसांच्या कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झालाय. श्वासोच्छवासाचा त्यांना पूर्वीपासून त्रास होता, त्यातूनच त्यांचा मृत्यू झाल्याचं शवविच्छेदन अहवालातून समोर आलंय. दरम्यान, यावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे.
“सोबत मी सोमनाथ सूर्यवंशीच्या शवविच्छेदनाचा अहवाल जोडत आहे. SHOCK FOLLOWING MULTIPAL INJURIES असे स्पष्ट शब्दात सोमनाथच्या मृत्यूचे कारण लिहिले आहे. व्याकरणातून विचार केला तर जखमांमुळे धक्का बसून सोमनाथचा मृत्यू झाला आहे, असा त्याचा अर्थ निघतो. या जुन्या जखमा आहेत, असे म्हणणे योग्य होईल का? सोमनाथच्या शरीरावर जुन्या जखमा आहेत, असे कुठेही शवविच्छेदन अहवालात म्हटलेले नाही. शवविच्छेदनाच्या अहवालाच्या पहिल्याच पानावर SHOCK FOLLOWING MULTIPAL INJURIES असे म्हटलेले आहे”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
“लपवा -छपवीचे हे उद्योग एका सर्वसामान्य गरीब कुटुंबातील एका मुलासोबत का केले जात आहेत? त्याला श्वासोच्छ्वासाचा त्रास होता; त्याची काही औषधे, काही क्लिनिकल रिपोर्ट्स, त्याच्या डाॅक्टरांचे अहवाल तपासलेत का? त्याचे घरचे तर नाकारत आहेत, त्याला कुठल्याही प्रकारचा आजार नव्हता, हे त्याचे कुटुंबीय सांगताहेत. मग, त्याला पूर्वीपासून श्वासोच्छवासाचा त्रास होता, हा जावईशोध कुठून लागला?”, असा सवाल आव्हाडांनी विचारला.
“श्वासोच्छवासाचा त्रास होता तर तो जेलमध्ये कुठे तडफडताना दिसला का? त्याला मृत म्हणूनच रूग्णालयात आणले आणि रूग्णालयानेही त्याला आणल्यानंतर तत्काळ मृत म्हणूनच घोषित केले. मग, पोस्टमार्टेम अहवालात ज्या जखमांचा उल्लेख केला आहे. त्या जखमा त्याला झाल्या कधी? त्याच्या शरीरावर किती जखमा होत्या? या मोठ्या अन् गंभीर प्रकरणाची अतिशय सोप्या पद्धतीने विल्हेवाट लावणे म्हणजे आपल्या मानवी संवेदना संपल्या आहेत, असेच बोलण्यासारखे आहे. जर त्याच्या मृत्यूचे कारणच समजणार नसेल तर माझ्या मते, अदृश्य शक्तींनी सोमनाथला मारहाण केली. त्या मारहाणीच्या जखमादेखील होऊ दिल्या नाहीत आणि त्यातच श्वास कोंडून त्याचे निधन झाले, असे म्हणायला हरकत नाही. कारणेच शोधायची झाली तर हे कारणदेखील होतं. न्यायाची अपेक्षा कोणाकडून करायची?” असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं आहे.
सोबत मी सोमनाथ सुर्यवंशीच्या शवविच्छेदनाचा अहवाल जोडत आहे. SHOCK FOLLOWING MULTIPAL INJURIES असे स्पष्ट शब्दात सोमनाथच्या मृत्युचे कारण लिहिले आहे. व्याकरणातून विचार केला तर जखमांमुळे धक्का बसून सोमनाथचा मृत्यू झाला आहे, असा त्याचा अर्थ निघतो. या जुन्या जखमा आहेत, असे म्हणणे…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 20, 2024
सभागृहात आज देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
परभणीतील घटनेवर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं की, “ही घटना घडल्यानंतर काही संघटनांनी ११ डिसेंबर रोजी बंद पुकारला होता. हा बंद शांततेत पार पडावा म्हणून पोलिसांनी शांतता समितीची बैठक घेतली होती. या बैठकीला ७० ते ८० विविध संघटनांचे कार्यकर्ते हजर होते. त्यानंतर काही संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील दिले होते. मात्र, त्यानंतर परभणीतील गंगाखेड रोडसह काही ठिकाणी आधी टॉवर जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर अचानक ३०० ते ४०० आंदोलक जमा झाले. काही लोकांनी त्या ठिकाणी तोडफोड केली. त्या ठिकाणी जमावाने बंद असलेल्या दुकानांची देखील तोडफोड केली. काही गाड्या जाळण्यात आल्या. मात्र, त्यानंतर पोलिसांनी जमावबंदी लागू केली. मात्र, तरीही परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याचं पाहून पोलिसांनी अश्रुधुराचा वापर करत लाठीचार्ज केला”, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली.