मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र हे ऐच्छिक रक्तदानात देशात प्रथम क्रमांक टिकवून आहे. ज्या ‘राज्य रक्त संक्रमण परिषदे’च्या (एसबीटीसी) माध्यमातून ही कामगिरी होते त्या ‘एसबीटीसी’मध्ये आज पूर्णवेळ सहाय्यक संचालक नाहीत. तसेच अनेक कर्मचाऱ्यांची पदे भरून नव्याने बळकटीकरण करण्याची आवश्यकता असल्याचे आरोग्य विभागातील ज्येष्ठ डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे जे.जे. महानगर रक्तपेढीची दूरावस्था झाली असून तेथे रक्तसंकलनापासून रक्तसाठवणूक व विलगीकरणासाठी अनेक उपकरणांची आवश्यकता असताना या रक्तपेढीच्या अडचणींकडे पाहण्यास उच्चदस्थांना वेळ नसल्याची खंत रक्तपेढीतील डॉक्टरांकडून व्यक्त करण्यात येत आहे. वेळीच रक्तपेढीसाठी आवश्यक ती उपकरणे व अन्य साधने न दिल्यास भविष्यात सुरक्षित रक्तपुरठ्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भितीही येथील कर्मचाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
जे.जे. महानगर रक्तपेढीची रक्तसंकलनाची क्षमता सुमारे ४५ हजार रक्ताच्या पिशव्या एवढी आहे. गेली काही वर्षे येथील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून वार्षीक ३० हजार रक्तसंकलन केले जात आहे.करोनाकाळातही येथील कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रक्तसंकलन करून शेकडो रुग्णांचे प्राण वाचवले होते. थॅलेसेमिया व सिकलसेलच्या रुग्णांना या रक्तपेढीच्या माध्यमातून नियमितपणे विनामूल्य रक्तपुरवठा केला जातो. रक्ताच्या एका पिशवीसाठी आकारण्यात येणाऱ्या रकमचा विचार करता जे.जे. महानगर रक्तपेढीचे एकेकाळी वार्षिक उत्पन्न सुमारे सात कोटी रुपये होते. तथापि थॅलेसेमिया व सिकलसेलच्या, तसेच बीपीएलच्या रुग्णांना मोफत रक्तपुरवठा करण्याच्या नियमामुळे आज रक्तपेढीचे उत्पन्न वार्षिक तीन कोटी एवढे झाले आहे. सध्या रक्तपढीत मंजूर पदे ४७ असून यातील अनेक पदे रिक्त आहेत, तर नियमित डॉक्टर मिळणेही कठीण झाले आहे. बंधपत्रित डॉक्टरांच्या माध्यमातून रक्तपेढीचा कारभार हाकण्यात येत असून वैद्यकीय समाजसेवक, तंत्रज्ञ यांचीही अनेक पदे रिक्त आहेत तसेच जादा पदांची आवश्यकता असून याबाबत ‘राज्य रक्त संक्रमण परिषद’ तसेच आरोग्य मंत्रालयाकडून ठोस निर्णयाची अपेक्षा आहे.
ग्रॅन्ट वैद्यकीय महाविद्यालय व जे.जे. रुग्णालयाची स्वतंत्र रक्तपेढी असून याच महाविद्यालयाच्या आवारात आरोग्य विभागाची जे.जे. महानगर रक्तपेढी आहे. या दोन्ही रक्तपेढ्यांची तुलना केल्यास जे.जे.रुग्णालयाच्या रक्तपेढीतून वार्षिक सहा ते सात हजार पिशव्या रक्तसंकलन होते. त्या तुलनेत तेथील रक्तपेढी तंत्रज्ञ व परिचारिकांना सरासरी ९० हजार रुपये वेतन मिळते तर वैद्यकीय समाजसेवकाला ७८ हजार एवढे वेतन आहे. या पार्श्वभूमीवर ‘जे.जे महानगर रक्तपेढी’च्या माध्यमातून वर्षिक ३० हजार रक्तसंकलन करण्यात येत असून शंभर टक्के रक्तविलगीकरण येथे केल्यामुळे ८० हजार ते एक लाख रुग्णांना रक्त व रक्तघटक उपलब्ध करून दिले जातत. मात्र येथील कर्मचाऱ्यांना कंत्राटी तत्त्वावर केवळ ३५ ते ४० हजार एवढेच वेतन देण्यात येते. तसेच केवळ २० वार्षीक रजा दिल्या जातात.
मुंबईपासून कर्जत – पालघरपर्यंत या रक्तपेढीच्या माध्यमातून सरासरी तीन ते पाच रक्तदान शिबिरांचे रोज आयोजन करण्यात येत असताना वैद्यकीय समाजसेवक, वाहानचालक, तसेच तंत्रज्ञांची वाढीव पदे भरण्याची आवश्यकता असल्याचे आरोग्य विभागाच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे. यातील गंभीरबाब म्हणजे २०१७ पासून या कर्मचाऱ्यांना जी वार्षिक ८ टक्के वेतनवाढ दिली जात होती त्यात कपात करून ५ टक्के करण्यात आली. वस्तुत: ‘एसबीटीसी’च्या मूळ धोरणानुसार सुरक्षित व पुरेसा रक्तपुरवठा करण्यासाठी कायमस्वरुपी कर्मचारी नियुक्ती, तसेच कंत्राटी असेपर्यंत २० ट्क्के वेतनवाढीचा निर्णय झाला होता. तथापि अचानक ‘जे.जे.महानगर रक्तपेढी’तील कर्मचाऱ्यांना ‘राष्ट्रीय आरोग्य मिशन’मध्ये (एनएचएम) समाविष्ट दाखविण्यात येऊन त्यांची वेतनवाढ ८ टक्क्यांवरून ५ टक्के करण्यात आली. येथील कंर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रक्तपेढीतील अनेक उपकरणे जुनी झाली असून सुरक्षित रक्तपुरवठ्याचा विचार करता ती बदलणे आवश्यक आहे. नॅट टेस्टींग, ब्लड बॅग सेलर, हिमोग्लोबीन चाचणीसाठी शिबिरांच्या ठिकाणी होमोक्यू यंत्र, ब्लड बॅग वेट यंत्र आदी अनेक गोष्टींची आवश्यकता आहे.
एकीकडे ‘राज्य रक्त संक्रमण परिषदे’ला पूर्णवेळ सहाय्यक संचालकाची नियुक्ती करण्यात आलेली नाही, तर दुसरीकडे ‘जे.जे. महानगर रक्तपेढी’च्या आधुनिकीकरणाकडे, तसेच कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे रक्तपेढीच्या कामकाजावर विपरित परिणाम होण्याची भिती येथील डॉक्टरांकडून व्यक्त करण्यात येत आहे. आरोग्य संचालक तसेच रक्तपेढीशी संबंधित सहाय्यक संचालकांनी गेल्या अनेक वर्षात एकदाही ‘जे.जे. महानगर रक्तपेढी’ला भेट देऊन तेथील समस्यांची पाहाणी केली नसल्याचे येथील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळेच कंटाळलेल्या ‘जे.जे. महानगर रक्तपेढी’च्या कर्मचाऱ्यांनी रक्तपेढीची दूरावस्था व त्यांच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी आरोग्यमंत्री तानाजी सावंत, तसेच अतिरिक्त मुख्य सचिव (आरोग्य) मिलिंद म्हैसकर यांना पत्राद्वारे साकडे घातले आहे.