अहमदनगर जिल्ह्यातील सोनई हत्याकांडात बळी पडलेले संदीप धनवर यांच्या वारसास समाजकल्याण विभागाच्या मालेगाव येथील शासकीय वसतिगृहात चतुर्थश्रेणीची नोकरी देण्याचा निर्णय विभागीय दक्षता व नियंत्रण समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. येथील विश्रामगृहात विभागीय आयुक्त डॉ. रवींद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत संदीप थनवर यांची पत्नी वैशाली धनवर यांचे पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने नोकरीचे आदेश देण्यात आले. बैठकीस विशेष पोलीस महानिरीक्षक धनंजय कमलाकर, समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त राजेंद्र कलाल, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त सु. भा. हिंगोणेकर, अहमदनगरचे पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे, जिल्हाधिकारी संजीवकुमार, नाशिकचे पोलीस अधीक्षक प्रवीण पडवळ, नंदुरबारचे पोलीस अधीक्षक डॉ. संजय अपरांती, जिल्हाधिकारी ओमप्रकाश बकोरीया, जळगावचे जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर आदी या वेळी उपस्थित होते.
या वेळी आयुक्तांनी विभागातील अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ मधील गुन्ह्यांचा लवकरात लवकर निपटारा करण्यासाठी पोलिसांनी संबंधित गुन्ह्यांबाबत लवकरात लवकर कार्यवाही करावी, असे निर्देशही जाधव यांनी दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या बैठका दर महिन्यास घ्याव्यात, असेही त्यांनी सुचविले. अ‍ॅट्रोसिटी अत्याचारबाधित नातेवाईकांना ११ महिन्यांत ३१ लाखांची मदत देण्यात आल्याची माहिती राजेंद्र कलाल यांनी दिली. भटक्या जाती, विमुक्त जातींसाठी असलेल्या सामाजिक न्याय विभागाच्या यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेसाठी लागणाऱ्या जागेबाबतचा आढावाही या वेळी घेण्यात आला.

Story img Loader