मागील वर्षी नवी दिल्ली येथे जी कटू घटना घडली, तशी पुढील काळात पुन्हा कधीच घडू नये, याकरिता प्रसार माध्यमांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. समाजातील या विकृतीवर कोणतेही औषध नाही. साहित्याच्या माध्यमातून ही विकृती नष्ट करून सामाजिक परिपक्वता आणण्यात पत्रकारिता महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकेल, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी येथे केले. पत्रकार दिनानिमित्त रविवारी जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण तटकरे यांच्या विशेष उपस्थितीत करण्यात आले, त्या प्रसंगी ते बोलत होते.
‘भ्रमर’चे संपादक चंदुलाल शाह व सटाण्याचे ज्येष्ठ पत्रकार विश्वास चंद्रात्रे यांना जीवन गौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप पाच हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ, असे आहे. तसेच जिल्हा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारांचे वितरणही करण्यात आले. त्यात ‘लोकसत्ता’च्या चारुशीला कुलकर्णी यांचा समावेश आहे. शालिमार चौकातील आयएमए सभागृहात झालेल्या या सोहळ्यास आ. शिरीष कोतवाल, पालिका आयुक्त संजय खंदारे, पत्रकार संघाचे अध्यक्ष यशवंत पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, शहराध्यक्ष शरद कोशिरे आदी उपस्थित होते.
स्वातंत्र्यपूर्व, स्वातंत्र्योत्तर व संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेत प्रसार माध्यमांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सामाजिक बांधीलकीच्या भावनेतून पत्रकार काम करतात. वृत्तवाहिन्यांमार्फत अव्याहतपणे ‘ब्रेकिंग न्यूज’चा मारा होत असला तरी वर्तमानपत्रांचे वाचन करूनच दिवसाची सुरुवात करणारे अनेक जण आहेत. जगात व देशात महाराष्ट्राची वेगळी ओळख निर्माण करण्यात प्रसार माध्यमांचे योगदान आहे. वर्तमानपत्र, पाक्षिक, मासिक यांची संख्या दिवसेंदिवस लक्षणीयपणे वाढत आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे या क्षेत्रात प्रचंड गतिमानता आली असून महाराष्ट्राच्या बदललेल्या स्थितीचे हे द्योतक असल्याचे तटकरे यांनी नमूद केले. सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या समस्या, सामाजिक विषय व शासनाच्या कामावर लक्ष ठेवण्याचे काम प्रसार माध्यमांकडून केले जाते. शासन सर्व काही काम चुकीचेच करते असे नाही तर काही विधायक कामेही करत असते, असे त्यांनी आपल्या खास शैलीत सांगितले. शासकीय प्रक्रियेत अंमलबजावणीत काही दोष राहू शकतात. कधीकधी व्यक्ती व्यक्तींमध्ये मतभेद असू शकतात असेही त्यांनी नमूद केले.
या वेळी संदीप दुनबळे (देशदूत), रवींद्र आखाडे (लोकमत), विनोद बेदरकर (सकाळ), साईप्रसाद पाटील (पुण्य नगरी), नीलेश अमृतकर (दिव्य मराठी), प्रियदर्शन टांकसाळे (गांवकरी), डी. एम. जगताप (भ्रमर), सोमनाथ ताकवले (पुढारी), सचिन वाघ (दिव्य मराठी), गायत्री काळकर (महाराष्ट्र टाइम्स), हेमंत बागूल (आयबीएन लोकमत), पल्लवी जुन्नरे (साम मराठी), चेतन कोळस (झी २४ तास), सागर वैद्य (एबीपी माझा), चंदन पुजारी (टीव्ही-९), राजेंद्र साखरे (सी न्यूज), शशिकांत पगारे (राजयोग) यांना जिल्हा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने गौरविण्यात आले. याव्यतिरिक्त ग्रामीण भागातील २७ पत्रकारांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आले.

Story img Loader