जागतिक जलदिनी काढणार मदतफेरी
जागतिक जलदिनाचे औचित्य साधून शुक्रवार २२ मार्च रोजी अलिबाग फोटोग्राफर असोसिएशन व अलिबाग प्रेस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांच्या मदतीकरिता मदतफेरीचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्षी महाराष्ट्रात १९७२पेक्षाही भयानक दुष्काळ पडला आहे. या परिस्थितीतून राज्याला सावरण्यासाठी प्रत्येकजण खारीचा वाटा उचलत आहे.  विविध सामाजिक संस्थांनी या कामी पुढाकार घेतला आहे. यामध्ये आपलाही वाटा असावा या भावनेतून अलिबागमधील छायाचित्रकार व पत्रकारांनी एकत्र येऊन या मदतफेरीचे आयोजन केले आहे. २२ मार्च रोजी सकाळी ८.३० वाजता अलिबाग शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून अलिबागच्या नगराध्यक्षा नमिता नाईक व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत या मदतफेरीस प्रारंभ होईल. तेथून सर्व शहरभर फिरून छत्रपती शिवाजी चौक (जोगळेकर नाका) येथे रॅलीचा समारोप होईल. या रॅलीतून जमा होणारा निधी दुष्काळग्रस्तांच्या मदतीकरिता जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द केला जाईल. या रॅलीत शहरातील नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Story img Loader