पत्रकारिता हे जरी अनिश्चित क्षेत्र असले तरी पत्रकारांनी आपल्या कर्तृत्वाने स्वतचे अढळ स्थान निर्माण करावे आणि राजकारण्यांवरील आपले अवलंबित्व संपवावे, अशी अपेक्षा सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.
सोलापूर श्रमिक पत्रकार संघाने आयोजित केलेला दिवंगत झुंजार संपादक रंगा वैद्य व बाबुराव जक्कल स्मृती पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित यांना रंगा वैद्य स्मृती राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार प्रदान केला. २५ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होते, तर १५ हजार रोख, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे स्वरूप असलेला बाबुराव जक्कल स्मृती जिल्हास्तरीय पत्रकारिता पुरस्कार श्रीकांत कांबळे यांना देण्यात आला. यावेळी व्यासपीठावर भाजपचे आमदार सुभाष देशमुख, काँग्रेसच्या आमदार प्रणिती िशदे, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार आदी उपस्थित होते.
पत्रकारितेचे अवमूल्यन होईल असे कोणतेही कृत्य पत्रकारांच्या हातून घडता कामा नये, अशी अपेक्षा व्यक्त करीत सहकारमंत्री पाटील यांनी सोलापूरच्या पत्रकारांचा मागील दहा वर्षांपासून रखडलेला प्रकल्प येत्या पंधरा दिवसात मार्गी लावण्याची ग्वाही दिली.
रंगा वैद्य स्मृती पुरस्काराचे मानकरी अनंत दीक्षित यांनी, रंगा वैद्यांच्या नावाचा पुरस्कार स्वीकारतानाचा क्षण आपल्या आयुष्यातील कृतार्थतेचा क्षण असल्याची भावना व्यक्त केली. श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी स्वागत, तर सचिव जगन्नाथ हुक्केरी यांनी प्रास्ताविक केले. पुरस्कार निवड समितीचे सदस्य दत्ता गायकवाड, प्रा. विलास बेत, अ‍ॅड. भगवान वैद्य आदींचा सत्कार करण्यात आला. श्व्ोता हुल्ले यांनी सूत्रसंचालन केले. दीपक शेळके यांनी आभार मानले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Journalist close dependency on politicians