बातम्या मिळवण्याची साधने अनेक असून पत्रकारांनी ती शोधून बातम्या केल्या पाहिजेत, असे मत मार्मिकचे कार्यकारी संपादक पंढरीनाथ सावंत यांनी व्यक्त केले. ते अलिबाग येथे रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे आयोजित पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते.
वाचकांना सहज कळेल आणि समजेल अशा शब्दातच बातमी लिहिली पाहिजे, असेही ते म्हणाले. एखादी नसलेली बातमी मोठी बातमी होऊ शकते, त्यासाठी बातमीचे वेगवेगळे अंग शोधले पाहिजे, असेही सावंत यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला ‘कृषीवल’चे मुख्य संपादक संजय आवटेदेखील उपस्थित होते. पत्रकारिता अर्थात जर्नालिझम हा एक इजम आहे म्हणजे आदर्शवाद आहे आणि त्या आदर्शवादाशी पत्रकारांनी एकनिष्ठ राहिले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. बदलत्या काळानुसार पत्रकारितेच्या स्वरूपातही बदल होत आहे. पत्रकारिता व्यावसायिक होते आहे. त्यामुळे ती अधिक सक्षम होते आहे. आपला वाचक हा आपला मालक असतो आणि त्या वाचकाशी तुम्ही एकनिष्ठ राहण्याचे काम पत्रकारांनी केले पाहिजे, असे आवटे यांनी स्पष्ट केले.
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाष पाटील यांनी पत्रकारांनी वस्तुनिष्ठ बातम्यांवर भर दिला पाहिजे, असे सांगितले. या कार्यक्रमाला नगराध्यक्षा नमिता नाईक, अलिबाग प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष प्रफुल्ल पवार आणि जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुलकर्णी उपस्थित होते.
 जिल्हा मराठी पत्रकार संघाकडून दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांचे वितरण या वेळी करण्यात आले. ज्येष्ठ साहित्यिक राजा राजवाडे पुरस्कार विलास नाईक यांच्या एक ना धड पुस्तकाला देण्यात आला. तर म. ना. पाटील स्मृती पुरस्कार कांतिलाल कडू यांना देण्यात आला. उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार मुरुडच्या नितीन शेडगे यांना देण्यात आला.