एसटी महामंडळाने दैनंदिन तिकीट दरांप्रमाणेच ‘आवडेल तेथे प्रवास’ योजनेतील पासेसच्या दरातही वाढ केली असून या एकाच वर्षांत चार वेळा दर वाढवण्याची पाळी एसटीवर आली आहे. चौथ्यांदा झालेल्या या दरवाढीमुळे ‘आवडी’च्या पाससाठी प्रवाशांवर गेल्या वर्षीपेक्षा ५५ ते ९५ रुपयांचा भरुदड पडण्यास सुरुवात झाली आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाला होत असलेला तोटा आणि डिझेलच्या किमतीत सातत्याने होणारी वाढ यामुळे एसटीने सामान्य तिकिटांचे दर वाढवले. एप्रिलपासून आतापर्यंत चार वेळा दरवाढ केली गेल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर आहे. ऑगस्टमध्ये दोनदा पासचे दर वाढवण्यात आले आहेत. १ एप्रिलला पहिल्यांचा या पासेसच्या दरात घसघशीत वाढ करण्यात आली होती. त्यानंतर ४ जूनला दर पुन्हा वाढवण्यात आले. ५ ऑगस्टला पुन्हा एकदा किंमत वाढली. आता २८ ऑगस्टपासून नवे वाढीव दर लागू झाले आहेत.
एसटी महामंडळ ‘आवडेल तेथे प्रवास’ ही योजना १९८८ पासून राबवित आहे. पूर्वी या योजनेत सात दिवसांच्या प्रवासाचा पास दिला जात होता. २००६ पासून चार दिवसांच्या कमी कालावधीच्या प्रवासासाठी पास दिले जाऊ लागले. २००३ पासून गर्दी आणि कमी गर्दी, अशा दोन हंगामासाठी पासेसचे वेगवेगळे दर ठरवण्यात आले. १५ ऑक्टोबर ते १४ जून हा गर्दीचा, तर १५ जून ते १४ ऑक्टोबर हा कमी गर्दीचा हंगाम मानला जातो. या योजनेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. पर्यटकांपासून ते दैनंदिन कामांसाठी प्रवास करणाऱ्यांमध्ये ही योजना लोकप्रिय ठरली, पण आता पासेसचे दर लागोपाठ वाढू लागल्याने या योजनेकडे प्रवाशांचा कल कमी होऊ लागला आहे. १ एप्रिलपूर्वी या योजनेत साध्या बससेवेसाठी गर्दीच्या हंगामात ४ दिवसांच्या पासचे दर प्रौढांसाठी ७५५ रुपये होते. ते ७८० रुपयांपर्यंत वाढवण्यात आले होते. ७ दिवसांच्या पाससाठी प्रवाशांना १३२० रुपयांऐवजी १३६० रुपये मोजावे लागले. जूनमध्ये ४ दिवसांच्या पासच्या दरात २० रुपयांची वाढ होऊन ते ८०० रुपयांवर, तर सात दिवसांच्या पासचे दर १४०० रुपयांवर पोहोचले. ५ ऑगस्टला लागू झालेल्या दरवाढीनुसार प्रवाशांना चार दिवसांच्या पाससाठी ८०५, तर सात दिवसांसाठी १४०५ रुपये मोजावे लागले. आता २८ ऑगस्टपासून चार दिवसांसाठी ८१० रुपये, तर सात दिवसांसाठी १४१५ रुपये, असा पासचा दर आहे. कमी गर्दीच्या हंगामात चार दिवसांच्या पासचे दर ७५० रुपये आणि सात दिवसांसाठी १३१० रुपये इतके आहेत.
पाच वर्षांत प्रवास दुपटीने महाग
‘आवडेल तेथे प्रवास’ योजनेत पाच वर्षांपूर्वी गर्दीच्या हंगामात चार किंवा सात दिवसांच्या प्रवासासाठी एका दिवसाला १२५ रुपये सरासरी खर्च येत होता. तो आता २०२ रुपयांवर पोहोचला आहे. कमी गर्दीच्या हंगामातील प्रवासही तुलनेने महागला आहे. एका पासवर दरदिवशी आता २०० रुपये खर्च करण्याची पाळी प्रवाशांवर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा