सोलापूर : नव्या दिल्लीत यशस्वीपणे पार पडलेल्या ‘जी-२०’ समुहाच्या शिखर परिषदेत सोलापूर जिल्ह्यातील महिला शेतकरी उत्पादक कंपनीसह अन्य एका शेतकऱ्याने शेतीमालाचे सादरीकरण केले. विशेषतः दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणीच्या अनिता माळगे यांच्या यशस्विनी महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या ज्वारीच्या भाकरीची विविध देशांच्या पंतप्रधान, राष्ट्राध्यक्षांच्या अर्धागिनींना भुरळ पाडली. मराठमोळ्या ज्वारीच्या भाकरी चव चाखून परदेशी पाहुण्यांनी महिला शेतक-यांचे कौतुक केले. त्यांच्याकडून शेतीव्यवस्थेची आस्थापूर्वक माहिती घेतली.
बोरामणीच्या अनिता योगेश माळगे यांच्याशिवाय रायगड जिल्ह्यातील भारती कातकरी यांना ‘जी-२०’ समुहाच्या शिखर परिषदेत, एका पौष्टिक तृणधान्य प्रदर्शनात ज्वारी आणि नाचणीच्या खाद्यपदार्थांचे दालन उभारण्याची संधी मिळाली होती. या प्रदर्शनात अनेक देशांच्या पंतप्रधान व राष्ट्राध्यक्षांच्या पत्नींनी भेट देऊन तृणधान्य खाद्यपदार्थांची पाहणी करून प्रत्यक्ष चवही घेतली. ज्वारीच्या भाकरीसह चकलीची चव चाखत या परदेशी पाहुण्यांनी बोरामणीच्या महिला शेतक-यांचे कौतुक केले. शेतीव्यवस्थेसह पीक लागवड, सिंचन, शेतीमाल विक्री, कौशल्य व्यवस्थापन इत्यादी बाबींची माहितीही जाणून घेतली.
याच प्रदर्शनात इटलीच्या प्रधानमंत्र्यांच्या पत्नी जाॕर्जिया मेलोनी, जपानच्या पंतप्रधानांच्या पत्नी योको किशिद, ब्रिटनचे प्रधानमंत्री ऋषी सोनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती, ब्राझिलच्या राष्ट्राध्यक्षांच्या पत्नी तसेच जागतिक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय बंग यांच्या पत्नी रितू बंग यांनी अनिता माळगे यांच्या मुक्त संवाद साधला. माळगे यांनी या सर्व जणींचा सत्कार करताना शेती उत्पादकांने नमुने भेट दिले. या माध्यमातून जागतिक पातळीवर तृणधान्य खाद्यपदार्थ पोहोचण्याची संधी मिळाल्याबद्दल अनिता माळगे यांनी धन्यता मानली.
याशिवाय माळशिरस तालुक्यातील निमगाव येथे गेली २३ वर्षे सेंद्रिय शेती यशस्वी करणारे जगन्नाथ पंढरीनाथ मगर यांना ‘जी-२०’ परिषदेत विषमुक्त शेती प्रयोगाचे सादरीकरण करण्याची संधी मिळाली. मगर यांनी यापूर्वीही अनेक राष्ट्रीय परिषदांमध्ये सेंद्रिय शेतीचे सादरीकरण केले होते.