अदाणींच्या कंपन्यांमधील २० हजार कोटी रुपये आले कुठून? जेपीसी हे सत्य शोधण्याचे संसदेच्या हातातील शस्त्र आहे, ती झालीच पाहिजे, असं म्हणत काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी आणि भाजपाचा खरपूस समाचार घेतला आहे. चोरांनाच टार्गेट केले जात असल्याप्रमाणे अदाणीला हिंडेनबर्गने टार्गेट केले. जगातील दुसरा श्रीमंत व्यक्ती अदाणींच्या कंपन्यांतील घोटाळा हिंडेनबर्ग अहवालाने बाहेर काढला. टाळेबंदात घोळ करून शेअर्सच्या किमती वाढवून लोकांना फसवले हे हिंडेनबर्ग अहवालाने जगासमोर आणले. हिंडेनबर्गच्या अहवालाला अदाणी उत्तर देऊ शकले नाही, त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करू शकले नाही. अदाणींचे ९ लाख कोटी रुपये पाण्यात गेले. जनतेच्या न्यायालयात हिंडेनबर्गला न्याय मिळाला. हिंडेनबर्ग फ्रॉड कंपन्यांना टार्गेट करते आणि सत्य बाहेर आणते. राहुल गांधींनी मोदी अदाणींचे सत्य जगासमोर आणले. राहुल गांधींना लोकसभेत बोलू दिले जात नव्हते. इतिहासात सत्ताधारी पक्षाने कधी लोकसभेचे कामकाज बंद पाडले नव्हते, मोदींच्या काळात ते झाले. राहुल गांधींचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी जंग जंग पछाडले, कायदेशीर प्रक्रिया पायदळी तुडवून राहुल गांधींचा आवाज बंद करण्यासाठीच सदस्यत्व रद्द केले. २००३ साली शीतपेयांमधील कीटकनाशकांचे अंश सापडले होते, यासंदर्भात शरद पवार यांच्या अध्यक्षतेखासी जेपीसीची स्थापना झाली होती. या समितीच्या अहवालामुळे आज शीतपेयाबाबतचे नियम कडक आहेत, याची आठवण पृथ्वीराज चव्हाण यांनी करून दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे येथे पार पडली. त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. या बैठकीला विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, AICC चे सचिव सहप्रभारी आशिष दुआ, संपतकुमार, खा. कुमार केतकर, माजी मंत्री विश्वजित कदम, माजी खासदार, हुसेन दलवाई, डॉ. भालचंद्र मुणगेकर, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष आ. वजाहत मिर्झा, सेवादलाचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, वरिष्ठ नेते उल्हास पवार, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, सरचिटणीस प्रमोद मोरे, देवानंद पवार, ठाणे शहर प्रभारी शरद आहेर, ठाणे शहर जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण, दयानंद चोरगे यांच्यासह राज्यातील प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचाः अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून अहवाल सादर करा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

भाजपाचा खोटारडा चेहरा जनतेसमोर आणणार ः नाना पटोले

राहुल गांधी यांच्यावर भाजपा सरकारने राजकीय सूडबुद्धीने कारवाई केली हे सर्वश्रुत आहे. यामागचा घटनाक्रम पाहिला तर ते सर्व स्पष्ट होते. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचे भाजपाचे प्रयत्न सुरू होते, पण जुनी खोटी केस उकरून कारवाई केली गेली. देशात लोकशाही व्यवस्था आणि संविधान राहिलेले नाही. काँग्रेसला जनतेचा पाठिंबा वाढत आहे, त्याचा पक्षाला फायदा होणार आहे, यासाठी भाजपाचा खोटारडा चेहरा जनतेसमोर आणण्याचा संकल्प आजच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत केलेला आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले.

संसदेत राहुल गांधींना बोलूच दिले नाही : बाळासाहेब थोरात

विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले की, राज्यातील यापुढचा कालखंड निवडणुकीचा असून त्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा ऐतिहासिक ठरली. यात ज्वलंत मुद्यांना आवाज उठवला गेला. त्यानंतर राहुल गांधी यांनी संसदेत केलेले मोदी-अदाणी संबंध काय असा प्रश्न विचारला. पण त्यानंतर मोदी सरकारने राहुल गांधी यांना संसदेत बोलूच दिले नाही, त्यांची मुस्कटदाबी केली. राहुल गांधींच्या वाढत्या लोकप्रियतेची भाजपाला भीती वाटते म्हणूनच ही मुस्कटदाबी करण्यात येत आहे. राहुल गांधी यांच्यावर झालेला अन्याय लोकांपर्यंत जाऊन सांगा. काँग्रेसला चांगले दिवस आहेत पुन्हा पक्षाला सोनियाचे दिवस येतील, असंही बाळासाहेब थोरातांनी स्पष्ट केलं.

राहुल गांधींवर आकसाने कारवाई केली : अशोक चव्हाण

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यावेळी म्हणाले की, राहुल गांधी यांनी संसदेत अदाणी घोटाळ्यासंदर्भात काही प्रश्न उपस्थित केले आणि मोदी अदाणी संबंध काय असा प्रश्न विचारताच मोदी सरकारने राहुल गांधींवर आकसाने कारवाई केली. हा प्रश्न एकट्या राहुल गांधी यांचा नाही तर सरकारच्या विरोधात बोलणाऱ्या प्रत्येकाचा प्रश्न आहे. देशातील आजची परिस्थिती पाहता भाजपा सरकारने लोकशाहीचा खून केला, असे म्हटले तर त योग्यच आहेत. राहुल गांधींना दोषी ठरवण्यामागचा घटनाक्रम नीट पाहा, हे सर्व जाणीवपूर्वक, सूडबुद्धीने केलेले षडयंत्र आहे हे दिसते. राज्यातील शिंदे सरकार आल्यापासून अंदाधुंद कारभार सुरू आहे. हे सरकार केवळ जोरदार घोषणाबाजी करते, त्यावर करोडो रुपये खर्च करते. शिंदे सरकार बेभान सरकार आहे. गारपीट झाली, शेतकरी संकटात असताना त्यांना मदत देण्याऐवजी वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्री आणि शिंदे सरकार अयोध्येत देवदर्शनाला गेले. हे कसले रामराज्य? असा प्रश्नही अशोक चव्हाणांनी उपस्थित केला.

हेही वाचाः भास्कर जाधवांनी वेस्ट इंडिजच्या खेळाडूशी तुलना केल्यानंतर बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “माझ्यावर…”

विशेष म्हणजे या कार्यकारिणी बैठकीत सात ठराव मांडण्यात आले ते पुन्हा मंजूर करण्यात आले.

ठराव नंबर एक – अदाणी-मोदी संबंध काय? आणि २० हजार कोटी रुपये कोणाचे? असे प्रश्न विचारल्यानेच राहुल गांधींवर कारवाई केली, त्याचा काँग्रेस पक्ष निषेध करत असून प्रदेश काँग्रेस त्यांच्यापाठीमागे खंबीरपणे उभा आहे.
ठराव नंबर दोन – जय भारत सत्याग्रह विविध आंदोलनाच्या माध्यमातून राज्यभर राबवणार.
ठराव नंबर तीन – राज्यातील शेतकरी संकटात आहे, त्याला मदत करण्याची गरज असताना शिंदे सरकार मदत देत नाही. तुटपुंजी मदत देत आहे, शेतकऱ्याला भरीव मदत दिली पाहिजे.
ठराव नंबर चार – काँग्रेसच्या ओबीसी राष्ट्रीय कार्यकारिणीत जातीनिहाय जनगणना करावी, असा ठराव मांडण्यात आला. जातीनिहाय जनगणना का केली जात नाही. असा आपला प्रश्न आहे. काँग्रेस सरकार आले तर ओबीसाठी मंत्रालय करून भरीव आर्थिक तरतूद केली जाईल.
ठराव नंबर पाच – राज्यात सामाजिक विद्वेष पसरवण्याचे षडयंत्र रचले आहे, जनतेने याला बळी पडू नये.
ठराव नंबर सहा – मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या आठवणी जागृत करण्यासाठी मविआ सरकारने कमिटी स्थापन केली होती. पण शिंदे सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. या कार्यक्रमात स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान करणे आणि त्यांचे स्मरण करणे, त्यांचा गौरव केला जावा असा कार्यक्रम वर्षभर राबवला जाणार आहे.
ठराव नंबर सात – राज्यात ३२ लाख मुले स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करीत असताना शिंदे सरकार मात्र आऊटसोर्सिंग करीत आहे. काँग्रेस सरकार आल्यानंतर या भरती केल्या जातील.
असे विविध ठराव मांडून मंजूर करण्यात आले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jpc is the right weapon to bring out the truth in adani scam says prithviraj chavan vrd