कराड : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने समाधान होत नसेल तर ज्यांच्या सल्ल्यामुळे तुम्ही मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला, आजपर्यंत ज्यांचे एकही वाक्य खरे ठरले नाही, आपल्या सल्लागारांचा सल्ला घ्या म्हणजे कळेल की आता व्हीप नेमका कुणाचा चालेल? असा टोला राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या शनिवारी (दि. १३) पाटणनजीकच्या दौलतनगर येथे होणाऱ्या ‘शासन आपल्या दारी’ राज्यस्तरीय शुभारंभाची माहिती देण्यासाठी आयोजिलेल्या पत्रकार परिषदेत ते दौलतनगरमध्ये बोलत होते.
आमदार अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिल्यास पुन्हा न्यायालयात जाऊ, या उद्धव ठाकरे यांच्या इशाऱ्याबद्दल शंभूराज म्हणाले, उद्धव ठाकरेंना आता नैराश्य आले आहे. न्यायालयाच्या निकालापूर्वी शिंदे सरकार जाणार असे भाकीत ते करत होते. न्यायालयाच्या निकालानंतर १६ आमदारांना तात्काळ निलंबित करू अशी भाषा ते वापरत होते. खरेतर न्यायालयाच्या निकालाने त्यांना चपराक बसली आहे. आता विधानसभा अध्यक्षांनी योग्य निर्णय दिला नाहीतर आम्ही न्यायालयात जाऊ असे पूर्वग्रहदूषित वक्तव्य ते करीत आहेत. या उलट विधानसभाध्यक्ष हे सर्वांना समान न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पहिल्यापासूनच सांगत असल्याचे शंभूराज म्हणाले.
उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलेल्या नैतिकतेच्या मुद्यावर बोलताना ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो लावून यांनी मते मागितली आणि सत्ता, पदासाठी महायुती सोडून महाविकास आघाडीबरोबर हे गेलेत. त्यामुळे ज्यांनी स्वतःच नैतिकता पाळली नाही त्यांनी आम्हाला त्याचे धडे देऊ नयेत.
अनिल परब हे खूप मोठे वकील. ते काहीही दावा करू शकतात. त्यामुळे त्यांच्या कोणत्याही पोकळ दाव्याकडे आम्ही लक्ष देत नाही. १६ आमदारच नव्हेतर विधानसभा अध्यक्षही अपात्र होतील. या त्यांच्या दाव्याची खिल्ली उडवताना सर्वोच्च न्यायालयाने निकालपत्रात १६ आमदारांबाबत तसेच विधिमंडळातील अधिकृत पक्ष कोण हे ठरविण्याचा अधिकारही अध्यक्षांना दिला आहे. निवडणूक आयोग स्वतंत्र यंत्रणा घटनेने निर्माण केलेली असून, पक्ष व चिन्हांबाबतीत निर्णय घेण्याचा त्यांना स्वतंत्र अधिकार आहे. त्यात हस्तक्षेप करणार नसल्याचे निकालपत्रात स्पष्ट आहे. त्यातही काही जण चुकीचे मत व्यक्त करीत आहेत हे योग्य नसल्याची टीका शंभूराजेंनी केली.
कार्यक्रमाची जय्यत तयारी
सर्वोच्च न्यायालयाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या न्यायालयाच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाच्या राज्यस्तरीय शुभारंभ कार्यक्रमाच्या निमित्ताने जाहीर व्यासपीठावर येत असल्याने याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या आहेत. या कार्यक्रमाला ३० ते ४० हजार लोकांची उपस्थिती असेल आणि सुमारे २५ हजार लाभार्थ्यांना याचा प्रत्यक्ष लाभ होईल असा विश्वास मंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. दरम्यान, कार्यक्रमाच्या भव्यतेसाठी मोठी वातावरण निर्मिती आणि जय्यत तयारी करण्यात आली आहे.