अलिबाग: अलिबागच्या लाचखोर तहसिलदार मिनल दळवी यांना पोलीस कोठडीची मुदत संपल्याने अलिबागच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना २८ नोव्हेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.बक्षीसपत्राने दिलेल्या जमिनीच्या सात – बाऱ्यावर तक्रारदार यांचे नाव चढविण्यासाठी तसेच जागेसंदर्भात दाखल झालेल्या अपिलाचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने देण्यासाठी मिनल दळवी यांनी तीन लाख रुपयांची लाच मागितली होती. खाजगी हस्तक राकेश चव्हाण याच्या मार्फत दोन लाखांची लाचेची रक्कम स्वीकारलीही होती. गेली दोन दिवस त्या पोलीस कोठडीत होत्या. पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने आज त्यांना अलिबाग येथील विषेश सत्र न्यायाधीश अशोक कुमार भिलारे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने दळवी यांची पोलीस कोठडी वाढवून मिळावी अशी मागणी यावेळी जिल्हा सरकारी वकील अँड भुषण साळवी यांनी केली. तर घरझडती आणि आवाज नमुने घेण्याचे काम पुर्ण झाले आहे. मुद्देमालही हस्तगत केला आहे. त्यामुळे आता पुन्हा पोलीस कोठडीची गरज नाही असा युक्तीवाद दळवी यांच्या वतीने अँड प्रविण ठाकूर यांनी केला. दोन्ही बाजूचे युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने तपास पुर्ण झाला असल्याने दोन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले. यानंतर दोन्ही आरोपींच्या वतीने जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Judicial custody of bribe taking tehsildars in alibaug tmb 01