IAS Puja Khedkar Reaction : प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाचे नियम डावलून आणि ओळख लपवून अधिक वेळा यूपीएससीची परीक्षा दिल्याचा ठपका खेडकर यांच्यावर ठेवण्यात आला आहे. यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच यूपीएसएसी परीक्षेत २०२२ साली झालेली निवड का रद्द करू नये? असाही सवाल आयोगाने उपस्थित केला आहे. याबद्दल सविस्तर पत्रकच काढण्यात आले आहे. यानंतर आता पूजा खेडकर यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
पूजा खेडकर काय म्हणाल्या?
पुण्यातील जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी पूजा खेडकर यांची तक्रार केल्यानंतर त्यांची वाशिम येथे बदली करण्यात आली होती. मागच्या दोन दिवसांपासून त्या वाशिम गेस्ट हाऊसमध्येच होत्या. आज दुपारी त्या गेस्ट हाऊसमधून बाहेर पडल्या. यावेळी माध्यमांनी त्यांना गराडा घालत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावळी त्या म्हणाल्या, “न्यायव्यवस्था त्यांचे काम करेल. त्यांचा जो काही निर्णय असेल तो मी स्वीकारेल.”
यूपीएससीकडून सखोल चौकशी
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रकरणानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाने पूजा खेडकर यांच्या प्रकरणाचा सखोल तपास केला. नागरी सेवा परीक्षा – २०२२ मधून पूजा खेडकर यांची निवड झाली होती. या तपासातून समोर आले की, पूजा खेडकर यांनी नावे बदलून अनेकवेळा यूपीएससीची परीक्षा दिली. प्रत्येक प्रवर्गासाठी परीक्षा कितीवेळा द्यावी, याची नियमावली आखून दिलेली आहे. पूजा खेडकर यांनी स्वतःचे, कधी वडील आणि आईचे नाव बदलून, तसेच स्वतःचा फोटो, स्वाक्षरी, ईमेल आयडी आणि फोन नंबर बदलून अनेकवेळा यूपीएससीची परीक्षा दिली, असे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पत्रकात म्हटले आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नोंदीनुसार पूजा खेडकर यांनी ओबीसी प्रवर्गातून नागरी सेवा परीक्षा – २०२२ मध्ये देशभरातून ८२१ क्रमांक मिळविला होता. ११ जुलै रोजी केंद्राने पूजा खेडकर यांच्या ओबीसी नॉनक्रिमीलेयर आणि अंपगत्वाच्या प्रमाणपत्राबद्दल चौकशी करण्यासाठी कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाचे अतिरिक्त सचिव मनोज कुमार द्वीवेदी यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती स्थापन केली होती.
हे ही वाचा >> Manorama Khedkar Arrested : IAS पूजा खेडकर यांच्या आईला रायगडमधून अटक, पिस्तुल दाखवून शेतकऱ्यांना दमदाटी करणं भोवलं!
पूजा खेडकर आईबद्दल काय म्हणाल्या?
वाशिम येथे माध्यमांच्या प्रतिनिधींनी पूजा खेडकर यांना त्यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्याबद्दलही प्रश्न विचारले. मनोरमा खेडकर या पुणे ग्रामीण पोलिसांच्या अटकेत आहेत. तुम्ही आईची भेट घेणार का? असे विचारल्यानंतर पूजा खडेकर यांनी ‘नाही’, असे उत्तर दिले.