वन्यजीवप्रेमींसाठी खुशखबर.. ताशी १२० किमी वेगाने धावणारा डौलदार चित्ता भारतात परत येतोय.. आणि मूळ नागपूरच्या असलेल्या डॉ. प्रज्ञा गिरडकर या एका मराठी महिलेने दक्षिण आफ्रिकेत जाऊन चित्त्यांच्या भारतातील पुनर्वसनासाठी केलेल्या अथक प्रयत्नांना आता यश आले आहे. साधारण आगामी सहा महिन्यात मध्य प्रदेशातील कुणो-पालपूर, नौरदोही अभयारण्य तसेच राजस्थानच्या जैसलमेरजवळील शाहगड येथील वाळवंटी आणि गवताळ प्रदेशात चित्ते दिसू लागतील. नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून आणण्यात येणाऱ्या चित्त्यांसाठी ५० लाख डॉलर्सची तरतूद भारत सरकारने केली असून चित्त्याला भारतीय वातावरण नवे नसल्याने येथील जंगलात रुळण्यास त्याला फार वेळ लागणार नाही, असा अंदाज आहे.
वन्यजीवशास्त्रात पीएच.डी. प्राप्त केलेल्या डॉ. प्रज्ञा गिरडकर यांनी मुंबई विद्यापीठात प्राध्यापिका म्हणून नोकरी केल्यानंतर २००८ साली वाईल्डलाईफ कंन्झव्र्हेशन अॅण्ड रुरल डेव्हलपमेंट नावाची संस्था नागपूर जिल्ह्य़ातील उमरेड तालुक्यात सुरू केली. सोमय्या महाविद्यालयातील डॉ. एस.जी. येरागी यांच्यापासून डॉ. प्रज्ञा यांना प्रेरणा मिळाली. त्यामुळे देशभरातील विविध जंगलांमध्ये वन्यजीवनाचा दीर्घ अभ्यास करून त्यांनी प्रचंड अनुभव गाठिशी बांधला. परंतु, चित्ता या प्राण्याबद्दल आकर्षण असल्याने चित्ता संवर्धन फंड संस्थेतर्फे महिनाभरासाठी नामिबियात जाण्याची संधी त्यांना मिळाली. आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींमध्ये त्या एकमेव भारतीय होत्या. भारत सरकारने चित्त्याच्या पुनर्वसनासाठी यादरम्यान प्रयत्न सुरू केले होते. त्यामुळे चित्त्याचा स्वभाव, आरोग्य आणि राहणीमानावर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले. डॉ. प्रज्ञा गिरडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार १८ चित्ते भारतात आणण्यात येणार आहेत.
दक्षिण आफ्रिकेतील महिनाभराच्या वास्तव्यात डॉ. प्रज्ञा यांना चित्ता कन्झव्र्हेशन फंडच्या संचालिका डॉ. लॉरी मार्कर यांच्याकडून चित्त्यांविषयी बरेच काही शिकता आले. हा अनुभव रोमांचकारी होता, असे डॉ. प्रज्ञा यांनी सांगितले. चित्त्यांच्या जगात वावरताना ५२ चित्त्यांचा सहवास या जिगरबाज मराठी तरुणीला लाभला. स्मॉल कॅट फॅमिलीत मोडणारा चित्ता हा वाघ किंवा सिंह या “बिग कॅट” प्राण्यांसारखा शीघ्रसंतापी प्राणी नाही, हा शांत स्वभावाचा आणि गटात मिसळून राहणारा अफलातून प्राणी आहे. “चित्ता रन” पाहण्याची संधी मिळणे दुर्मीळ आहे, रॅम्पवर कॅटवॉक करणाऱ्या सुंदर ललनांपेक्षाही चित्त्याचे डौलदार धावणे उठावदार असते आणि हा अनुभव डॉ. प्रज्ञा यांनी घेतला. अक्षरश: हवेत तरंगत जात आहे की काय, अशी चित्त्याची धाव त्यांनी याची डोळा पाहिली.
एकेकाळी भारतात १० हजार चित्ते होते. परंतु, १९४७ साली मध्य प्रदेशच्या महाराजाने देशात शिल्लक असलेले शेवटचे तीन चित्ते नष्ट केले आणि चित्ता हा देखणा प्राणी भारतातून नामशेष झाला. त्यामुळे भारतात चित्त्यांचे संवर्धन हे पर्यावरणवाद्यांपुढील खूप मोठे आव्हान ठरणार आहे. चित्ता हे नावदेखील मूळ भारतीयच आहे. टाऊनी रंग, भरजरी साडीवरील बुट्टय़ांप्रमाणे अंगावर काळे ठिपके, लांबसडक पाय, छोटासा चेहरा, स्प्रिंगसारखा वाकणारा पाठीचा कणा, एखाद्या सौदर्यवतीला लाजवेल अशी कटी ही चित्त्याची वैशिष्टय़े जगभराचे आकर्षण राहिलेली आहेत आणि तो पुन्हा भारतात परत येतोय..
डौलदार चित्ता भारतात परत येतोय!
वन्यजीवप्रेमींसाठी खुशखबर.. ताशी १२० किमी वेगाने धावणारा डौलदार चित्ता भारतात परत येतोय.. आणि मूळ नागपूरच्या असलेल्या डॉ. प्रज्ञा गिरडकर या एका मराठी महिलेने दक्षिण आफ्रिकेत जाऊन चित्त्यांच्या भारतातील पुनर्वसनासाठी केलेल्या अथक प्रयत्नांना आता यश आले आहे. साधारण आगामी सहा महिन्यात मध्य प्रदेशातील कुणो-पालपूर, नौरदोही अभयारण्य तसेच राजस्थानच्या जैसलमेरजवळील शाहगड येथील वाळवंटी आणि गवताळ प्रदेशात चित्ते दिसू लागतील.
आणखी वाचा
First published on: 08-09-2012 at 08:53 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jungle lover forest forest lover panther resevre forest chita