रायगड जिल्हा खो-खो असोसिएशन व अवधूत तटकरे मित्रमंडळ, रोहा यांच्या संयुक्त विद्यमाने २ ते ५ या कालावधीत धाटाव, तालुका- रोहा येथे ४१ व्या ज्युनिअर राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा रोहा तालुका क्रीडा संकुल, धाटाव येथे खेळली जाणार आहे. २ मे रोजी दुपारी २.३० वाजता रायगड जिल्ह्य़ाचे पालकमंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात येणार आहे. आमदार अनिल तटकरे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार असून रोह्य़ाचे नगराध्यक्ष अवधूत तटकरे, रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भाई पाशिलकर, रोहा तालुका पंचायत समितीच्या सभापती सौ. अनिता शिर्के, रोहा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मधुकर पाटील, रायगड जिल्हा खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष विजय मोरे, रायगड जिल्हा खो-खो असोसिएशनचे कार्यवाह नथूराम पाटील आदी मान्यवर या वेळी उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेत राज्यातील २४ जिल्ह्य़ांचे ज्युनिअर मुले व मुलांचे संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेतील खेळाडूंची कामगिरी पाहून त्यांची महाराष्ट्राच्या संघात निवड केली जाणार आहे. हे संघ राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील.

Story img Loader