सातारामधील वडूज पोलिसांनी अत्याचाराच्या गंभीर गुन्ह्यात ताब्यात घेतलेल्या एका अल्पवयीन संशयिताने बालसुधारगृहात आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
या अल्पवयीन आरोपीला मागील काही दिवस सातारा येथील बालसुधारगृहात ठेवण्यात आला होते. दरम्यान, आज सकाळी बाल सुधारगृहामध्ये त्याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. मृताच्या नातेवाइकांनी बाल सुधारगृहाबाहेर जमण्यास सुरूवात केल्यानंतर पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला होता. सहाय्यक पोलीस अधीक्षक आंचल दलाल, पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, खटाव तालुक्यातील एका गावात राहणार्या अल्पवयीन तरूणावर त्याच्याच नात्यातल्या युवतीवर अत्याचार केल्याचा गुन्हा वडूज पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. त्यानंतर संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर तो अल्पवयीन असल्याने त्याला सातारा येथील बाल सुधारगृहात ठेवण्यात आले होते. दरम्यान त्याने शनिवारी सकाळी बालसुधारगृहातच आत्महत्या केल्याची घटना घडली.