शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे यांना आमदार करा, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. शिवसंग्राम टिकवण्यासाठी आणि गरीब मराठ्यांना न्याय देण्यासाठी ज्योती मेटेंना आमदारकी द्यावी, असे संभाजीराजे म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे संभाजीराजेंनी ही मागणी केली आहे.
दरम्यान, ज्योती मेटेंना विधानपरिषद आमदार करावे, अशी मागणी याआधीच शिवसंग्राम संघटनेकडून करण्यात आली आहे. १४ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात बोलवलेल्या बैठकीसाठी विनायक मेटे बीडहून मुंबईच्या दिशेने येत होते. रविवारी पहाटे ५ च्या सुमारास महामार्गावरील माडप बोगद्याजवळ त्यांच्या कारला भीषण अपघात झाला. या अपघातात विनायक मेटेंचा दुर्देवी मृत्यू झाला. याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीआयडी चौकशीचे आदेश दिले आहेत.
मुख्यमंत्र्यांची दिलीप वळसे पाटील यांच्या निवासस्थानी भेट; राजकीय चर्चा झाली नसल्याचा दावा
विनायक मेटे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या केंद्रस्थानी होते. मराठा समाजातील नेत्यांची मोट बांधून आरक्षणासाठी सामाजिक आंदोलन उभे करण्यात मेटेंचे मोठे योगदान होते. मराठा समाजासाठी त्यांचे हे कार्य पुढेही सुरू राहावे, यासाठी त्यांच्या पत्नी ज्योती मेटेंना आमदारकी द्यावी, अशी मागणी विविध स्तरातून करण्यात येत आहे.