सोलापूर : विद्रोही साहित्य चळवळीत अनेक वर्षांपासून सक्रिय असलेल्या आणि उत्कृष्ट सूत्रसंचालन, प्रभावी वक्तृत्वशैलीमुळे नावारुपाला आलेल्या सोलापूरच्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आणून उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या प्रा. सुषमा अंधारे यांच्या विरोधात तोडीस तोड पर्याय निर्माण करण्याच्या हालचाली सुरू झाले आहेत.

प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत नुकतीच भेट घेतली असून त्यांनी स्वतः या घडामोडींबाबत दुजोरा दिला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीप्रसंगी पक्षाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे हे उपस्थित होते. उद्धव ठाकरे गटातील शिवसेनेत पूर्वाश्रमीच्या विद्रोही साहित्य चळवळीच्या प्रा. सुषमा अंधारे प्रबोधन यात्रा व अन्य व्यसपीठावरून भाजपासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर आक्रमकपणे टीकास्त्र सोडत आहेत. फुले-शाहू-आंबेडकर विचारांसह प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांची शिदोरी घेऊन प्रा. अंधारे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे बहुजन समाजाला आकर्षित करण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यांचा प्रभाव वरचेवर वाढत असतानाच त्यांच्या तोडीस तोड ठरेल, अशा नेत्याचा शोध मुख्यमंत्री शिंदे गटाने चालविला होता. त्यानुसार सोलापूरच्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांचा पर्याय सुचविण्यात आला आहे. त्याप्रमाणे प्रस्ताव प्राप्त होताच प्रा. वाघमारे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. येत्या आठवडाभरात पक्षात कोणती जबाबदारी दिली जाणार, हे निश्चित झाल्यानंतर आपण शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे प्रा. डॉ. वाघमारे यांनी सांगितले.

हेही वाचा – बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या ‘त्या’ टीकेचा नितीन देशमुखांनी घेतला समाचार; मतीमंद प्रदेशाध्यक्ष असा उल्लेख म्हणाले…

अनुसूचित जातीच्या मोची समाजातून आलेल्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे उच्च विद्याविभूषित असून मराठी आणि इंग्रजी भाषा व साहित्यावर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. यापूर्वी काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या निकटवर्तीय समजल्या गेलेल्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी सोलापूर शहर जिल्हा महिला काँग्रेसचे अध्यक्षपदही सांभाळले होते. नंतर त्या आमदार प्रणिती शिंदे यांच्यापासून दुरावल्या.

Story img Loader