कर्नाटकमध्ये काँग्रेसने बहुमत मिळवल्यानंतर आज पक्षाने राज्यात सत्ता स्थापन केली. कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून आज सिद्धरामय्या यांनी शपथ घेतली. तर उपमुख्यमंत्री म्हणून डीके शिवकुमार यांनी शपथ घेतली. हा शपथविधी सोहळा दुपारी १२.३० वाजता पार पडला. या शपथविधी सोहळ्याला देशभरातील १९ विरोधी पक्षांना बोलवण्यात आलं होतं. मात्र महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची या सोहळ्याला अनुपस्थिती होती. यावरून आता सत्ताधारी भाजपा आणि शिवसेनेच्या शिंदे गटाकडून टीका सुरू आहे.

शिवसेनेच्या शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी या शपथविधीला उद्धव ठाकरे अनुपस्थित असल्याने त्यांच्यावर निशाणा साधला आहे. वाघमारे म्हणाल्या, कर्नाटकमध्ये सिद्धरामय्या सरकारचा शपथविधी पार पाडला. झाडून सगळ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना निमंत्रण होतं पण काँग्रेसने कस्पटासमान वागणूक देत उबाठा सेनेच्या (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) कोणत्याही नेत्याला निमंत्रण दिलं नाही. काँग्रेसच्या सत्ताप्राप्तीचा आनंद आपल्याच घरी पूत्र जन्माला आला या पद्धतीने पेढे वाटून साजरा करणाऱ्यांना मात्र बारशाचं आमंत्रण नव्हतं.

ज्योती वाघमारे म्हणाल्या, भारत जोडो यात्रेमध्ये राहुल गांधींसोबत फिरले आणि सगळीकडे काँग्रेसचा प्रचार केला. उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या मोहात हिंदुत्व सोडलं आणि आज हेच लोक तुम्हाला किंमत देत नाहीत. घरात नाही दाणा आणि मला हवलदार म्हणा अशी ठाकरे पितापुत्रांची अवस्था झाली आहे. तर सिद्धरामय्या यांच्यापेक्षाही मोठी खुर्ची देऊन आपल्याला बोलावतील असं उद्धव ठाकरेंना वाटलं होतं का असा प्रश्नदेखील ज्योती वाघमारे यांनी विचारला आहे.

हे ही वाचा >> “राज ठाकरेंनी फडणवीसांसाठी काही शिल्लकच ठेवलं नाही”; मनसे अध्यक्षांच्या ‘त्या’ टीकेला सुधीर मुनगंटीवारांचं उत्तर

उद्धव ठाकरेंना या शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण नव्हतं असा दावा वाघमारे यांनी केला असला तरी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी यांनी उद्धव ठाकरेंना फोन करुन शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण दिलं होतं, असं सांगितलं जात आहे. उद्धव ठाकरे हे या सोहळ्याला अनुपस्थित का राहिले? हे अद्याप समजू शकलेलं नाही.

Story img Loader