अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी आज मातोश्री येथे जाऊन शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर वेणुगोपाल यांनी माध्यमाशी बातचित केली. वेणुगोपाल म्हणाले की, उद्धव ठाकरे हुकूमशाहीविरोधात लढत आहेत आणि या लढाईत काँग्रेस त्यांच्यासोबत आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचा हाच निरोप घेऊन मी इथे आलो आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

के. सी. वेणुगोपाल म्हणाले की, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांचा निरोप घेऊन मी इथे आलो आहे. देशातली आणि महाराष्ट्रातली जी राजकीय परिस्थिती आहे. देशात लोकशाहीची पायमल्ली होत असताना आपण पाहतोय. लोकशाहीविरोधी ताकदींशी उद्धव ठाकरे लढत आहेत. देशातले सत्ताधारी लोक सर्वच विरोधकांना लक्ष्य करत आहेत. त्यात शिवसेनेला सर्वाधिक त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु या काळत काँग्रेस शिवसेनेसोबत आहे. आम्ही उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत आहोत.

काँग्रेसचे वरिष्ठ नेते वेणुगोपाल म्हणाले की, विरोधकांची मोट बांधण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत. तुम्ही पाहिलंच असेल राहुल गांधी नुकतेच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना भेटले. त्यानंतर ते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भेटले. हुकूमशाहीवाल्या मोदी सरकारविरोधात लढण्यासाठी विरोधकांनी एकत्र येणं गरजेचं आहे. हाच या भेटीमागचा मुख्य उद्देश आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: K c venugopal says congress is with uddhav thackeray and shiv sena after matoshree visit asc