वाई: जागतिक संवेदनशील भाग म्हणून ज्याची घोषणा करण्यात आली आहे, अशा कास पठारावर पर्यटन महोत्सवाच्या नावाखाली नियमबाह्य पद्धतीने मनोरंजनाचे व खाद्य महोत्सवाचे शासनानेत आयोजन केल्याची कबुली जिल्हाधिकारी रुचेस जयवंशी यांनी निवेदनाद्वारे दिली आहे. दरम्यान, याप्रकरणी लोकप्रतिनिधीदेखील मूग गिळून गप्प आहेत. दरम्यान, या महोत्सवासाठी पठारावर वृक्षतोड आणि अन्य प्रकारे निसर्गाचे नुकसान केल्याबद्दल स्थानिक आयोजकांविरुद्ध वन विभागाच्या वतीने गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दुसरीकडे या महोत्सवाविरुद्ध निसर्गप्रेमींपासून सामान्य नागरिकांपर्यंत अनेकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
शासनाचा पर्यटन विभाग, वन विभाग आणि सातारा जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने सात ते नऊ ऑक्टोबर या कास महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी रुचेस जयवंशी यांनी निवेदनाद्वारे दिली. कास पठाराला दरवर्षी लाखो पर्यटन भेट देतात. या निसर्ग पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन विभाग वन विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
या महोत्सवानिमित्त येणाऱ्या पर्यटकांना या परिसरातील गावांच्या वैशिष्टय़ांची माहिती देण्यात येणार आहे. येथील स्थानिक गावांना त्या गावातील बचत गटांना येथे प्रत्येकी एक स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. वनविभागातर्फे कास परिसराची माहिती, वैशिष्टय़े, विविधतेची माहिती पर्यटकांना दिली जाईल असे या निवेदनात म्हटले आहे.
असे महोत्सव नकोत : शिवेंद्रसिंहराजे
कास पठार हे जागतिक पातळीवर संवेदनशील भाग आहे. अशा स्थळावर निसर्ग पर्यावरणाला बाधा आणणारे महोत्सव भरवणे चुकीचे आहे. अशा चंगळवादी महोत्सवांमुळे पठारावरील जैव संपदेला धोका निर्माण झाला आहे, असे मत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केले आहे.