भविष्यातील गरज लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेने यंदा प्रथमच राज्यस्तरीय अजिंक्यपद अर्थात निवड चाचणी स्पर्धा मॅटवर घेतली. या निर्णयाचा ग्रामीण भागातील खेळाडूंना लाभ होणार असून यापुढे कबड्डीच्या जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय सर्वच स्पर्धा मॅटवर घेण्याची गरज राज्य संघटनेचे सरकार्यवाह मोहन भावसार यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केले असले तरी नाशिक महापौर चषक कबड्डी स्पर्धेच्या नियोजन प्रक्रियेत ते स्वत: सहभागी असतानाही ही स्पर्धा मातीच्या मैदानावरच होणार आहे. त्यामुळेच मॅटवरील कबड्डीचा प्रवास निश्चितच सहजसुलभ नसल्याचे दिसत आहे.
मागील वर्षी विश्वचषक विजेत्या भारतीय महिला कबड्डी संघाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या महाराष्ट्रातील खेळाडूंना राज्य संघटनेचे अध्यक्ष तथा राज्याचे तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी प्रत्येकी एक कोटी रूपये देण्याचे जाहीर केल्यानंतर कबड्डीकडे पाहण्याचा सर्वसामान्यांचा दृष्टिकोण कमालीचा बदलला. आतापर्यंत कबड्डीला नाक मुरडणारे बहुतेक पालक आपल्या मुलांना कबड्डीच्या सरावासाठी पाठविण्यास तयार होत असल्याचे दिसू लागले. या बदलत्या वातावरणाचा फायदा घेण्यासाठी राज्य संघटनाही तयार झाली. सांगली येथील राज्य अजिंक्यपद स्पर्धा प्रथमच मॅटवर घेण्याचा निर्णय, या प्रक्रियेचाच एक भाग म्हणावा लागेल. राज्यात काही कंपन्या, संस्था व संघटनांनी मॅटवर कबड्डी स्पर्धाचे आयोजन केले असले तरी, राज्य संघटनेच्या वतीने प्रथमच असा प्रयोग झाल्याचे भावसार यांनी नमूद केले. राज्य कबड्डी संघटनेचे अध्यक्ष अजित पवार हे अर्थमंत्री असताना त्यांनी प्रत्येक जिल्हा संघटनेस मॅट उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडील एक आणि जिल्हा संघटनेकडील एक, याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात दोन मॅट उपलब्ध झाल्याचा दावा भावसार हे करीत असले तरी काही संघटनांना अद्यापही मॅट मिळालेले नाही. तसेच राज्यस्तरीय स्पर्धा मॅटवर घेण्याआधी त्याची सुरूवात तालुका किंवा जिल्हास्तरापासून करण्याची आवश्यकता होती. जर प्रत्येक जिल्हा संघटनेकडे मॅट उपलब्ध असल्याचे सांगण्यात येते तर, मग इतके दिवस ही मॅट कुठे होती, शालेय जिल्हास्तरीय स्पर्धासाठी मॅटचा उपयोग याआधी का झाला नाही, असे प्रश्न उपस्थित होणे साहजिकच. नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी सुधीर मोरे यांनी कार्यालयास केवळ सहा-सात महिन्यापूर्वी मॅट मिळाल्याची माहिती दिली. शालेय वयातच खेळाडूंची मॅटशी दोस्ती झाल्यावर आणि नियमित सरावाने मॅटवरील कबड्डीतही कौशल्य आत्मसात करणे खेळाडूंना सहजशक्य आहे.
मॅटवर नियमितपणे सराव होत नसेल तर, ती उपलब्ध होऊनही काही फायदा नाही. त्यासाठी यापुढे जिल्हास्तरीय शालेय, उपकनिष्ठ, कनिष्ठ स्पर्धा मॅटवरच घेण्याची गरज आहे. असे केल्यास शालेय स्तरापासून खेळाडूंना मॅटवर खेळण्याचा सराव होईल. केवळ शासनाने एखादा निर्णय घेऊन योग्य होणार नाही तर, स्थानिक संघटनांनी मॅटवर कायम स्पर्धा कशा होतील, हे पाहाणे महत्वपूर्ण आहे. ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी तर कबड्डीसाठी धड मैदानही नसते. अशा ठिकाणी मैदान व्यवस्थित करून मॅटवर त्या भागातील खेळाडूंना कशाप्रकारे सराव उपलब्ध करून देणे शक्य होईल, यावर जिल्हा संघटनांनी विचार करणे आवश्यक असल्याचे मत भावसार यांनी व्यक्त केले. अर्थात त्यासाठी राज्य संघटनांकडूनही वारंवार देखरेख ठेवण्याची गरज आहे. जिल्हा संघटनांकडून मॅटचा खरोखर वापर होतो किंवा नाही हे पाहाणे अधिक महत्वाचे. कारण मॅट सरावासाठी आणणे, तिचा सांभाळ करणे, हे जिकिरीचे काम. जिल्हा संघटना त्यासाठी कायम तयार असतीलच असेही नाही. हे सर्व अडथळे लक्षात घेऊन राज्य संघटनेने जिल्हा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे निव्वळ मॅट या विषयावर शिबीर घेणे आवश्यक आहे. मॅटवर अधिकाधिक सराव होत राहिल्यास खेळाडूंच्या कामगिरीत नक्कीच सुधारणा होऊ शकते. एखाद्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कबड्डी स्पर्धाचे आयोजन आता यापुढे मातीच्या मैदानाऐवजी मॅटवर करणे आवश्यक झाले आहे. त्यासाठी आयोजक संघटनांनी आग्रही राहिले पाहिजे. अशा स्पर्धाचा खर्च जो कोणी करणार आहे, त्या खर्चात मॅटची ने-आण, सांभाळण्याचा खर्चही प्रस्तावित करण्याची गरज आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी भावसार यांनीच मुंबई, नवीमुंबई, पिंपरी-चिंचवड या महापालिकांप्रमाणे नाशिक महापालिकेनेही दरवर्षी कबड्डी स्पर्धाचे आयोजन करण्याविषयी मत व्यक्त केले होते. परंतु या महिना अखेरीस नाशिक येथे होणारी महापौर चषक कबड्डी स्पर्धा मातीवरच होणार आहे. स्पर्धेसाठी अखिल भारतातून मान्यवर संघ निमंत्रित करण्यात येणार असल्याने अशा संघातील खेळाडूंबरोबर मॅटवर खेळण्याचा सराव नाशिककर खेळाडूंचाही झाला असता. काही डावपेच, मॅटवरील कौशल्य आत्मसात करता आले असते. महत्वाचे म्हणजे नाशिकच्या प्रेक्षकांना मॅटवरील कबड्डी कशी असते, त्याचा अनुभव घेता आला असता. ही स्पर्धा मॅटवर न होण्यामागे कमी कालावधी, अधिक सामने आणि एकच मॅट, अशी कारणे देण्यात येत आहेत. प्रामुख्याने खेळाडूंची मागणी, मैदानाची स्थिती, स्पर्धा आऊटडोअर असणे, यामुळे ही स्पर्धा मातीच्या मैदानावर होत असल्याचे सुधीर मोरे यांनी सांगितले.

Story img Loader