Kailas Gorantyal : विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मोठं बहुमत मिळालं, तर महाविकास आघाडीला पराभवाचा धक्का बसला. खरं तर विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या अनेक मोठ्या नेत्यांनाही पराभवाला सामोरं जावं लागलं. यामध्ये काँग्रेसच्याही अनेक नेत्यांचा समावेश आहे. आता काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी आपल्या पराभवाची खदखद बोलून दाखवली आहे. जालना विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला. आता जालना जिल्ह्यातील राजकारणासंदर्भात बोलताना कैलास गोरंट्याल यांनी मोठं विधान केलं आहे. ‘आपण पाच वर्ष वाट पाहणार नाहीत, जालन्यात राजकीय भूकंप कसे कसे येतात ते तुम्ही पाहा, एकेक भूकंप कसा कसा होईल हे सगळ्यांना समजेल’, असं विधान कैलास गोरंट्याल यांनी एका कार्यक्रमात बोलताना केलं आहे.
कैलास गोरंट्याल काय म्हणाले?
“आमचं राजकारण जालन्यात आहे, जालन्यात जास्त काम केलं तर लोक जाना म्हणतात. काम करा, पण असं वाटलं पाहिजे की काम करत आहोत. माझे मित्र राजेश टोपे यांनी कोरोना काळात चांगलं काम केलं. पण लोकांनी त्यांना यावेळी जाना (निवडणुकीत पराभव झाला त्याबद्दल) म्हटलं. मलाही लोकांनी जाना (पराभव झाला) म्हटलं. सर्वात जास्त काम कोणी केलं असेल तर आम्ही केलं. मात्र, ज्या-ज्या ठिकाणी आम्ही जास्त काम केलं, त्या-त्या ठिकाणी माझ्या विरोधात फतवा निघाला”, असं कैलास गोरंट्याल यांनी म्हटलं.
हेही वाचा : “मला आणि राजन साळवींना शिंदे गटाकडून…”, वैभव नाईक यांचा मोठा गौप्यस्फोट
“जालन्यात असं आहे की, मतलब के है यार मगर दिल के सब काले है! मोका मिलतेही ये डसने वाले है! किस मे कितना जहर है हमको पता है की सबसे ज्यादा साप हमीने पाले है!, जालन्यात अस्तिनचे साप खूप आहेत बर का काळे साहेब (खासदार कल्याण काळे). मी माझा अनुभव तुम्हाला सांगतोय. कारण जे माझ्याबरोबर झालं ते तुमच्याबरोबर २०२९ मध्ये होऊ नये. मात्र, मी तुम्हाला आज सांगतो, मी पाच वर्ष थांबणार नाही. मी एकदा बोललो तर बोललो. मी पाच वर्ष वाट बघणार नाही. पण तुम्ही सावध राहा. तुम्ही शेवटचे बॅट्समन आहात, त्यामुळे तुम्हाला शंभर धावा काढायच्या आहेत. कारण आम्ही तर बाहेर आहोत. आता निवडणुका आल्या आहेत पण विधानसभेच्या नाहीत. मी आज तुम्हाला शब्द देतो की जालन्यात राजकीय भूकंप कसे कसे येतात तुम्ही पाहा. एकेक भूकंप कसा-कसा येईल हे सगळ्यांनाच कळेल”, असं मोठं विधान कैलास गोरंट्याल यांनी केलं.
दरम्यान, कैलास गोरंट्याल यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. ‘जालन्यात राजकीय भूकंप कसे कसे येतात तुम्ही पाहा’, कैलास गोरंट्याल यांच्या या विधानाचा अर्थ नेमकं काय? याबाबत आता राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत. तसेच कैलास गोरंट्याल यांच्या या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.