वादग्रस्त अध्यात्मिक गुरू कालीचरण महाराज यांनी ‘हिंदुंना वोट बँक बना’ आणि ‘राजकारणाचं हिंदूकरण करा’, असं आवाहन केलं आहे. यावेळी त्यांनी लव जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा करण्याचीही मागणी केली ते सोलापूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.
कालीचरण महाराज म्हणाले, “मी सर्वांना आवाहन करतो की, राजकारणाचं हिंदूकरण करण्याचा प्रयत्न करा. हिंदू जातीवाद, वर्णवाद, भाषावाद तोडून हिंदू वोटर बँक बनले, तरच हिंदुंचं अस्तित्व टिकेल.”
“कोणत्याही कायद्याची मंजुरी हवी असेल, तर हिंदुंनी ‘वोटर बँक’ बना”
“राजा कट्टर हिंदुवादी असेल, तरच हिंदुत्वाचं रक्षण होईल. रामराज्य हवं असेल तर राजा राम पाहिजे. धर्मराज्य पाहिजे असेल, तर राजा धर्म पाहिजे. म्हणून हिंदुत्वाचं कल्याण करायचं असेल आणि कोणत्याही प्रकारच्या कायद्याची मंजुरी हवी असेल तर हिंदुंनी वोटर बँक बनावं. तरच तुमचं महत्त्व राजांच्या लक्षात येईल”, असं मत कालीचरण महाराजांनी व्यक्त केलं.
व्हिडीओ पाहा :
“…तर राजा लोक तुमच्याकडे अजिबात लक्ष देणार नाही”
कालीचरण महाराज पुढे म्हणाले, “तुम्ही वोटर बँक नसाल तर राजा लोक तुमच्याकडे अजिबात लक्ष देणार नाही. त्यामुळे हिंदुंनी सावध होऊन राजकारणाचं हिंदूकरण केलं पाहिजे. स्वतः १०० टक्के मतदान करणारी वोटर बँक बना. तरच सर्व मागण्या पूर्ण होतील.”
हेही वाचा : परधर्मीय पुरुषाने मुलीवर अन्याय करायचा नाही, आणि स्वधर्मातील पुरुषाने केला तरी चालेल, असं आहे का?
“सर्व हिंदूवादी संघटना मिळून मोर्चे काढत आहेत”
“महाराष्ट्रात लव्ह जिहाद आणि धर्मांतरण विरोधी कायदा व्हावा यासाठी मोर्चे निघत आहेत त्याचे आम्हीच सर्वेसर्वा नाही. सर्वच संघटना ते मोर्चे काढत आहेत. आम्ही फक्त या मोर्चांचा एक भाग आहोत. यात सगळ्यांचंच श्रेय आहे. सर्व हिंदूवादी संघटना मिळून हे काम करत आहेत,” असंही कालीचरण महाराजांनी नमूद केलं.