छत्तीसगडमधील धर्मसंसदेत महात्मा गांधींबद्दल बोलताना शिवराळ भाषा वापरल्यामुळे कालीचरण महाराज हे नाव चांगलेच चर्चेत आले होते. महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरल्यामुळे या महाराजावर गुन्हादेखील दाखल करण्यात आला होता. दरम्यान या महाराजाने राजकारणाचे हिंदूकरण झाले पाहिजे. धर्माचे रक्षण केले तर राष्ट्राचे रक्षण होईल, असे म्हणत भारत देशाला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करा, अशी मागणी केली आहे.
हेही वाचा >> “पंडितजी आतापर्यंत आम्ही पाच जणांना मारलंय,” भाजपाच्या माजी आमदाराचे धक्कादायक विधान
“गोवंश हत्याबंदीचा कायदा करण्यात यावा. लव्ह जिहाद, दहशतवाद समाप्त झाला पाहिजे. यासाठी राजकारणाचे हिंदूकरण करणे गजरेचे आहे. हिंदूंना राजकारणात आणणे गरजेचे आहे. श्री कृष्ण, प्रभू रामचंद्र हे सगळे राजे महाराज राजकारण करायचे. धर्माच्या राज्याची स्थापना करण्यासाठी राजकारणाचे हिंदूकरण करणे गरजेचे आहे. आपल्याला कट्टर हिंदूवादी नेत्यांना समर्थन दिले पाहिजे,” असे कालीचरण महाराज म्हणाला.
“हिंदूंची व्होटबँक तयार होण्यास जातीवाद, प्रांतवाद, वर्णवाद, भाषावाद हे अडथळा ठरत आहेत. या सर्वांना नष्ट करणे गरजेचे आहे. असे केले नाही तर आपला धर्म नष्ट होईल. धर्म नष्ट झाला तर १२ हजार वर्षांसाठी नरकामध्ये जावे लागेल. त्यामुळे लोक-परलोग शाबूत ठेवण्यासाठी धर्माचे रक्षण करणे गरजेचे आहे. धर्माचे रक्षण केले तर राष्ट्राचेही रक्षण होईल. हिंदूंपासूनच हिंदूस्थान आहे. येथे हिंदू बहुसंख्य आहेत. भारताला हिंदू राष्ट्र घोषित केले जावे. राजकारणही हिंदूवादी असावे. कट्टर हिंदूवादी लोकांनाच राजकारणात पाठवले पाहिजे,” असेदेखील कालीचरण महाराज म्हणाला.
हेही वाचा >> “देवेंद्र फडणवीस भाजपा-सेना युतीचे मुख्यमंत्री होणार,” चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे विधान
दरम्यान, महात्मा गांधींविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर कालीचरण महाराजाने छत्रपती शिवाजी महाराजांविषयीदेखील विधान केले होते. राष्ट्ररक्षणासाठी हिंसा करण्याचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिल्याचं कालीचरण महाराज यावेळी म्हणाला होता. “राष्ट्ररक्षणासाठी हिंसा करणे हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी आदर्श घालून दिला आहे. आपण राष्ट्ररक्षणासाठी आणि धर्मरक्षणासाठी शस्त्र उचललं पाहिजे. म्हणून गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण यांचे आदर्श धारण केले पाहिजेत. राष्ट्ररक्षणसााठी आपण हिंसक बनायला हवं. जशी आपली सेना आहे. याशिवाय उपाय नाही”, असं विधान कालीचरणने केले होते.