Kalyan Society Scuffle Devendra Fadanavis : कल्याणच्या योगीधाम परिसरातील अजमेरा सोसायटीत एका मराठी माणसाला झालेल्या मारहाणीचा मुद्दा चांगलाच पेटल्याचे पाहायला मिळत आहे. या प्रकरणी विरोधकांकडून विधिमंडळ अधिवेशनात प्रश्न विचारण्यात आले. राज्यात भाजपाचे सरकार आल्यापासून मराठी माणसांवर अन्यायाच्या घटना वाढल्यात का? असा प्रश्न देखील विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. यादरम्यान काल कल्याणच्या अजमेरा हाइट्स या सोसायटीत झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या कारवाईबद्दल तसेच विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत माहिती दिली.
पती-पत्नी दोघांवर गुन्हा दाखल
कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला मारहाण करणाऱ्या आरोपींविरोधात माहिती देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “विरोधी पक्षाच्या सदस्यांनी महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. अखिलेश शुक्ला आणि त्याच्या पत्नीने भांडणामध्ये मराठी माणसाला अपमानीत होईल असे उद्गार काढले, भांडण मारामारी केली. यातून एक संतापाची लाट लोकांमध्ये तयार झाली आहे. अखिलेश शुक्ला हा एमटीडीसीचा कर्मचारी आहे. त्याच्यावर आणि पत्नीवर एफआयआर नोंद झाला आहे. त्याला तात्काळ निलंबित करण्याची कारवाई करण्यात येत आहे आणि पुढील कारवाई पोलीस करतील”
“मुंबई आणि महाराष्ट्र हा मराठी माणसाचाच होता, मराठी माणसाचाच आहे आणि मराठी माणसाचाच राहिल. कधी-कधी काही नमूने चुकीचे वक्तव्य करतात, माज आल्यासारख करतात, अशा माजुरड्यांचा माज उतरवल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत”, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितले.
राज्यात भाजपा सत्तेत आल्यापासून हे प्रकार वाढल्याच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले की, “भाजपाचं सरकार आलं म्हणून हे झालं असा राजकीय रंग देण्याचं काही करण नव्हतं. आपल्याला याचाही विचार करावा लागेल की मुंबईतील माणून हद्दपार का झाला? कोणाच्या काळात झाला? का त्या माणसाला ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार याच्या पलिकडे जावं लागलं?”.
फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, “आपण मान्य केलं पाहिजे की मुंबई महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे. त्या आर्थिक राजधानीमध्ये देशभरातली टॅलेंट पूल येतो आणि ते सगळे तिथे राहतात. मुंबईत तीन-चार पिढ्यांपासून रहाणारा उत्तर प्रदेशातील एखाद्या जिल्ह्यातून आलेला व्यक्ती तुमच्या माझ्यासारखी उत्तम मराठी बोलतो. आपले सगळे सणवार साजरा करतो. गणपती सारखा आपला सण तो साजरा करतो तेव्हा तो उत्तर भारतीय आहे की मराठी असा प्रश्न पडतो. मात्र काही लोकं माजुरडे पणाने बोलतात त्यामुळे मुंबईच्या सोशल फॅब्रिकला गालबोट लागतं”.
“मराठी माणसाचा आवाज म्हणून विधान परिषदेच्या माध्यमातून मी ठणकावून सांगतो की कुठल्याही परिस्थिती मराठी माणसावर अन्याय होऊ देणार नाही” असेही फडणवीस म्हणाले.