कबड्डीत नाशिक आर्टिलरी व पुणे शिवाई विजेते
मनमाड येथील कमलेश सांगळेने आपल्याच जिल्ह्यातील सिन्नर येथील प्रताप ढोकणे यांस अस्मान दाखवीत येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर आयोजित नाशिक महापौर चषक कुस्ती स्पर्धेत ‘महापौर केसरी’ होण्याचा मान मिळविला. कबड्डीत पुरुषांमध्ये नाशिक आर्टिलरी सेंटरने, तर महिलांमध्ये पुण्याच्या शिवाई संघाने विजेतेपद मिळविले.  बुधवारपासून सुरू असलेल्या क्रीडा महोत्सवाचा समारोप रविवारी रात्री झाला. कुस्तीच्या दोन मैदानांवरील सामने मॅटवर झाले. महापौर केसरीची लढत चुरशीची झाली. कमलेशने प्रतापला धोबीपछाड देताच प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. कमलेश यास महापौर चषकासह ५१ हजार रुपये रोख व प्रमाणपत्र महापौर अ‍ॅड. यतीन वाघ, स्थायी समिती सभापती उद्धव निमसे यांच्या हस्ते देण्यात आले. उपविजेता प्रताप ढोकणे यास चषक व ३१ हजार रुपये रोख देण्यात आले. भगूर येथील ज्ञानेश्वर शिंदे तृतीयस्थानी राहिला. त्यास २१ हजार रुपये देण्यात आले. १७ व्या ग्रीको रोमन राज्य स्पर्धेत ९६ किलो गटात पुण्याच्या महेश मोहोळने सांगलीच्या विक्रम पाटीलवर मात केली. ८४ किलो गटात नाशिकच्या ज्ञानेश्वर मरकडने रावसाहेब धाम यास पराभूत केले. कबड्डी स्पर्धेत पुरुषांमध्ये नाशिक आर्टिलरी सेंटरने, तर महिलांमध्ये पुण्याच्या शिवाई संघाने विजेतेपद मिळविले. पुरुषांमध्ये तृतीय स्थान पुणे पोलीस संघ, तर महिलांमध्ये साताऱ्याच्या शिवाजी उदय मंडळाने मिळविले. विजेत्यांना जिल्हा कबड्डी संघटनेचे उपाध्यक्ष दौलतराव शिंदे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा