सातारा : पर्यावरणीयदृष्ट्या अतिसंवेदनशील असलेल्या साताऱ्यातील दुर्गम कांदाटी खोऱ्यात सध्या मोठ्या प्रमाणात डोंगरफोड सुरू आहे. या डोंगरांतून मिळणारा दगड, खडी, मुरुम आदींचा सर्रास वापर ठेकेदारांकडून विकासकामांसाठी केला जातो. खोऱ्यातीलच अहिर (ता. महाबळेश्वर) गाव हद्दीत अशाच प्रकारे डोंगर फोडत हजारो ब्रास गौण खनिज उत्खनन केल्याचे उघडकीस आले आहे. यातून वन, वन्यजीव कायद्याचे उल्लंघन होत असून, पर्यावरणप्रेमींकडून संबंधितांवर कारवाईची मागणी केली जात आहे.

साताऱ्याच्या पश्चिमेस पर्यावरणीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील (इको सेन्सेटिव्ह झोन) विभागामध्ये कोयना भागातील कांदाटी खोऱ्यात नवीन महाबळेश्वर प्रकल्पाचे प्रयोजन आहे. त्यामुळे या भागात रस्ते आणि अन्य (पान ४ वर) (पान १ वरून) विकासकामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. या कामांसाठी लागणारे डबर, मुरुम, खडी, क्रशसॅण्ड आदींसाठी संबंधित ठेकेदारांकडून परिसरातीलच डोंगर फोडले जात आहेत. आधी वृक्षतोड, नंतर डोंगर फोडत त्यातून दगड, मुरुम बाहेर काढला जातो. त्यातून मिळणाऱ्या दगडावर या जंगलातच खडी तयार केली जाते.

संवेदनशील भागांत मोठे विकास प्रकल्प राबवताना तेथील वन्यजीवांना खूप मोठ्या प्रमाणात धोका उत्पन्न होतो. या पार्श्वभूमीवरच नवीन महाबळेश्वर प्रकल्पाला विरोध होत आहे. परंतु हा प्रकल्प अस्तित्वात येण्याआधीच कांदाटी खोऱ्यातील ही डोंगरफोड समोर आली आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराची चौकशी करत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी पर्यावरणप्रेमींमधून होत आहे.

पोकलेन, डम्परची रात्रंदिवस वर्दळ

अहिर खोऱ्यातील अहिर गावात डोंगर फोडत हजारो ब्रास गौण खनिज उत्खनन केल्याचे उघडकीस आले आहे. येथे रात्रंदिवस पोकलेन, ट्रॅक्टर, डम्पर आदींची वर्दळ सुरू आहे. त्यामुळे या प्रकाराला हरकत घेत, उत्खननासाठी कोणतीही परवानगी नसताना हे डोंगर कसे फोडले जात आहेत, त्यांना परवानगी कशी मिळते, असा प्रश्न स्थानिकांनी विचारला आहे.

अत्यंत संवेदनशील अशा कांदाटी खोऱ्यातील अहिर गावाच्या हद्दीत सुरू केलेल्या दगडखाणींमुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान झाले आहे. या खोऱ्यातील जैवविविधतेवर गदा आली आहे. या खाणीसाठी कोणी परवानगी दिली, याचीही चौकशी झाली पाहिजे. संबंधित खाण बंद करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी आणि ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे. – सुशांत मोरे, सह्याद्री वाचवा मोहिमेतील कार्यकर्ते

कांदाटी खोऱ्यातील अहिर परिसरात खाणकामाला परवानगी देता येत नाही. या प्रकाराची चौकशी करून त्यामध्ये तथ्य आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल. – तेजस्विनी पाटील, तहसीलदार, महाबळेश्वर

Story img Loader