Kangana Ranaut in Nagpur : राज्यातील निवडणुकांच्या प्रचारसभांसाठी केंद्रीय मंत्र्यांसह अनेक केंद्रीय नेते राज्यात तळ ठोकून आहेत. भाजपाचे जवळपास हजारो स्टार प्रचारक महाराष्ट्रात आले आहेत. पंकजा मुंडे यांनी मिश्किलीत म्हटलंय की ९० हजार बुथसाठी भाजपाने ९० हजार लोकांना महाराष्ट्रात बोलावलंय. हे स्टार प्रचारक जागोजागी जाऊन उमेदवारांसाठी प्रचार करत आहेत. हिमाचल येथील मंडी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार कंगना रणौत यांनीही आज महाराष्ट्रात येऊन नागपूर येथील आर्वी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सुमित वानखेडे यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. या प्रचारसभेत त्यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीवर तोफ डागली.
कंगना रणौत म्हणाल्या, “आज महाराष्ट्राच्या या धरतीवर येऊन माझा जन्म सफल झाला. माझा जन्म हिमालाच्या कुशीत झाला असला तरीही तिथं माझं कोणतंही अस्तित्व नव्हतं. मी जेव्हा महाराष्ट्रात आले, तेव्हा कंगनाला कंगना बनवले. मुंबईत मला माझं नाव, माझं काम, माझी रोजीरोटी मिळाली. आज या सभेत मला बोलावून महाराष्ट्राप्रती माझं दायित्व पूर्ण करेन.”
“गेल्या वेळच्या निवडणुकीत काय काय झालं होतं? आमच्या भाजपाच्या हातात हात घालून निवडणुका लढवल्या. पण मुख्यमंत्री बनण्याच्या स्वार्थापायी त्यांनी सत्तेच्या लालसेपोटी बाळासाहेब ठाकरेंचे तत्व विकून महाविकास आघाडी नाही महाअनाडी सरकार बनवली. अनाडी सरकार बनलं तेव्हा या लोकांनी धर्माचा विनाश सुरू केला”, अशी टीका कंगना रणौत यांनी केली.
महाअनाडी सरकारने…
“अत्याचार सुरू केले. संविधानाचा अपमान केला गेला. साधुंनी रस्त्यावर ठेचून मारलं गेलं. आमच्या चित्रपटसृष्टीतही लोकांचा श्वास गुदमरू लागला. लोक आत्महत्या करू लागले होते. प्रत्येक ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला होता. महाअनाडी लोकांनी माझ्या घरातील एक एक वीट तोडली होती. असे अन्याय एका मुलीवर केले होते”, अशी टीकाही कंगना रणौत यांनी केली.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या काळात कंगना रणौत यांच्या मुंबईतील घरावर मुंबई पालिकेने बुल्डोझर चालवला होता. यावरून कंगना रणौत यांनी महाविकास आघाडीवर टीका केली.