भाजपाचे आमदार नितेश राणे हे कणकवली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. कणकवली विधानसभा मतदारसंघ हा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड, वैभववाडी आणि कणकवली या तालुक्यांचा कणकवली विधानसभा मतदारसंघात समावेश होतो. आमदार नितेश राणे हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री तसेच भाजपाचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचे चिरंजीव आहेत. नितेश राणे हे २०१९ मध्ये सलग दुसऱ्यांदा कणकवली मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले.
काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नितेश राणे यांनी हिंदुत्वाची कास पकडली आहे. वादग्रस्त विधानांमुळे नितेश राणे हे नेहमी चर्चेत असतात. त्यांचे वडिल भाजपाचे ज्येष्ठ नेते नारायण राणे हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत. २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांचा पराभव केला. रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील राजकारणावर राणे कुटुंबाची पकड आहे.
हेही वाचा : फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन, पुन्हा येईन, पुन्हा येईन’नंतर आता अजित पवारांचं ‘येणार, येणार, येणारच’!
२०१४ व २०१९ मध्ये कणकवली विधानसभा निवडणुकीतील स्थिती
२०१४ मध्ये नितेश राणे यांनी काँग्रेसकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. कणकवली मतदारसंघातून ते विधानसभेवर निवडून गेले होते. २०१४ ची विधानसभा निवडणूक भाजपा व शिवसेना यांनी स्वतंत्रपणे लढवली होती. त्यावेळी काँग्रेसच्या नितेश राणे यांनी भाजपाचे उमेदवार प्रमोद जठार यांचा पराभव केला. नितेश राणे यांना ७४७१५ मते मिळाली, तर भाजपाच्या प्रमोद जठार यांना ४८७३६ व शिवसेनेच्या सुभाष मयेकर यांना १२८६३ मते मिळाली. राणे यांनी भाजपाच्या जठार यांचा २५ हजारांहून अधिक मताधिक्याने पराभव केला होता. २०१४ मधील विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालिन काँग्रेसचे नेते नितेश राणे यांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात मॉडेलवर तसेच भाजपावर टीका केली होती. तसेच मुंबईतील गुजराती नागरिकांनादेखील नितेश राणे यांनी टीकेचे लक्ष्य बनवले होते.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी नारायण राणे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. नारायण राणे यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष देखील त्यावेळी भाजपमध्ये विलीन करण्यात आला. त्यानंतर त्यांचे पूत्र नितेश राणे व निलेश राणे यांनीदेखील कणकवली येथे पार पडलेल्या कार्यक्रमात भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. नितेश राणे यांच्या भाजपा पक्ष प्रवेशास शिवसेनेकडून कडाडून विरोध झाला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपा-शिवसेनेची युती होती. युती असूनही शिवसेनेने कणकवली विधानसभा मतदारसंघात भाजपा उमेदवार नितेश राणे यांच्या विरोधात उमेदवार दिला. शिवसेनेकडून सतीश सावंत यांना उमेदवारी देण्यात आली होती.
हेही वाचा : जरांगेची मतपेढी अपक्षांच्या पाठीशी ?
भाजपाच्या नितेश राणे यांना ८४५०४ मते मिळाली, तर शिवसेनेच्या सतीश सावंत यांना ५६३८८ मते मिळाली. राणे यांनी सावंत यांचा तब्बल २८११६ मतांनी पराभव केला. शिवसेना – भाजपाच्या महायुतीत वादग्रस्त ठरलेल्या जागेपैकी एक म्हणजे कणकवली मतदारसंघ होता. त्यामुळे ही निवडणूक शिवसेना विरुद्ध भाजपा अशी रंगली होती.
आता सामना नितेश राणे आणि संदेश पारकर यांच्यात….
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये भाजपाचे उमेदवार नारायण राणे यांना कणकवली विधानसभा मतदारसंघातून सुमारे ९२ हजार, तर प्रतिस्पर्धी ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांना ५० हजार मते मिळाली. नितेश राणे यांच्या कणकवली विधानसभा मतदारसंघातून भाजपाला तब्बल ४२ हजार मतांची आघाडी मिळाली होती.
अपेक्षेप्रमाणे कणकवली विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा नितेश राणे यांना उमेदवारी मिळाली, भाजपाने त्यांना तिकीट दिलं. तर यावेळी त्यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार कोण असेल याची उत्सुकता होती. अनेक नावे चर्चेत असतांना यावेळी संदेश पारकर यांना नितेश राणें विरोधात ठाकरे गटाने मैदानात उतरवले. गेली अनेक वर्षे राजकारणात सक्रिय असलेले संदेश पारकर यावेळी हॅटट्रीकच्या प्रतिक्षेत असलेल्या नितेश राणे यांना कशी टक्कर देतात याची उत्सुकता होती. विशेषतः प्रचारा दरम्यान उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राणे यांच्यात पुन्हा एकदा जोरदार वाक् युद्ध बघायला मिळाले.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत नितेश राणे यांचा ५८ हजारांहून अधिक मताधिक्याने विजय झाला आहे. त्यांना १ लाख ८ हजार ३६९ इतकी मते मिळाली. तर ठाकरे गटाचे उमेदवार संदेश पारकर यांना ५० हजार ३६२ मते मिळाली. या विजयानंतर नितेश राणे हे सलग तिसऱ्यांदा विधानसभेवर निवडूण गेले आहेत. कणकवली मतदारसंघात नितेश राणे यांनी त्यांचे वर्चस्व कायम ठेवले आहे.