धाराशिव शहरापासून अगदी अठरा किलोमीटर अंतरावर बाराव्या शतकातील कन्नड शिलालेख आढळून आला आहे. हा शिलालेख कलचुरी राजा संकमदेव द्वितीय याच्या राज्यरोहणाच्या दुसऱ्या वर्षी राजसत्तेवर असताना विलंब संवत्सर, वैशाख शुद्ध पंचमीला म्हणजे २४ एप्रिल ११७८,वार सोमवार रोजी कोरला गेला असल्याचे संशोधनातून पुढे आले आहे. कन्नड शिलालेखांचे तज्ञ डॉ. श्रीनिवास पाडीगर यांनी केलेल्या वाचनातून धाराशिव तालुक्यातील धारूर गावातून कलचुरी कालखंडातील पुरावे समोर आले असल्याची माहिती इतिहास संशोधक डॉ. विजय सरडे यांनी दिली.
धाराशिव जिल्ह्यातील धारूर येथे भैरवनाथ मंदिराच्या आवारात मराठी व कन्नड भाषेतील दोन शिलालेख ठेवलेले आहेत. त्यांपैकी कन्नड शिलालेखाचे वाचन अद्यापही झाले नव्हते. इतिहास संशोधक डॉ. विजय सरडे त्यासाठी अनेक दिवसांपासून प्रयत्न करीत होते. सुरुवातीला त्यांनी या शिलालेखाचे ठसे घेतले. त्यातून धाराशिवनजिक असलेल्या धारूरचा काळाच्या पडद्याआड असलेला इतिहास जगासमोर येण्यास मदत झाली आहे.फार वर्षांपूर्वी धाराशिव जिल्ह्यातील हा भूभाग कलचुरी राज्यात मोडत होता.
हेही वाचा… Maharashtra News Live : माजी मंत्री नितीन राऊत यांचं काँग्रेसमधील राजकीय वजन घटलं?
सरडे यांच्या पाठपुराव्यानंतर डॉ.श्रीनिवास पाडीगर यांनी या शिलालेखाचे वाचन केले. एका सातेय नायक नावाच्या स्थानिक शेतकऱ्याने सोमनाथ मंदिराला दिलेल्या दानाचा उल्लेख या शिलालेखात करण्यात आला आहे. या अनोख्या माहितीमुळे जिल्ह्यासह राज्याच्या इतिहासात वेगळी भर पडली असल्याचे संशोधक सरडे यांनी सांगितले.
शिलालेखातील माहितीनुसार ‘धारऊर’ (आजचे धारूर) येथील स्थानिक शेतकरी सातेय नायक याने सोमनाथ देवाच्या मंदिराला दान दिल्याचा उल्लेख या शिलालेखात आलेला आहे. सदर शेतकऱ्याने मंदिरासाठी २० कोपरे जमीन, १२ हात लांबीचे घर, तसेच १५ हात लांबीचा जनावरांचा गोठा दान स्वरूपात दिला होता. तसेच हे दान करमुक्त व अव्याहतपणे उपयोगासाठी नियमित करून दिले.
हेही वाचा… सांगली : शालेय विद्यार्थ्यांकडून सैनिकांना राख्या
डॉ.सरडे यांनी या लेखाचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे सांगितले. या लेखाच्या वाचनाने धारूर गावाचे ‘धारऊर’ हे प्राचीन नाव नव्यानेच उजेडात आले आहे. तसेच या भागावर बाराव्या शतकात संकमदेव द्वितीय नावाचा कलचुरी राजा राज्य करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सुमारे ८०० वर्षांपूर्वी एका स्थानिक शेतकऱ्याने दिलेल्या दानाचा उल्लेख प्राप्त झाल्याने तत्कालीन सामाजिक व धार्मिक जीवन-पद्धतीवर प्रकाश पडण्यास मदत होणार आहे. या संशोधन कार्यात प्रा. शिवाजी वाघमोडे यांनीही।अनमोल मार्गदर्शन केल्याचे डॉ. सरडे यांनी सांगितले.