मलकापूर नगरपंचायतीने मुलींसाठी अमलात आणलेली ‘प्रियदर्शनी कन्यारत्न योजना’ वैशिष्टय़पूर्ण असून, महाराष्ट्र शासन राज्यभर राबविण्याचा विचार करेल. येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर चर्चा होईल असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. मलकापूरला नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणारे शहर म्हणून ख्याती लाभली आहे. या मॉडेल सिटीचे अनुकरण इतर स्थानिक स्वराज्य संस्थांनीही करावे असे सुचवताना मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी विकासकामांच्या संधीचे सोने केल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी त्यांना शाबासकी देऊ केली.
मलकापूर नगरपंचायत व राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या संयुक्त सहकार्याने श्रीमती प्रेमलाताई चव्हाण कन्या सुरक्षा अभियानांतर्गत विद्यार्थिनींना मोफत बसप्रवास पास तसेच यासाठीच्या बससेवेचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज मोठय़ा दिमाखात पार पडला. त्या वेळी ते बोलत होते. या अभियानाचे प्रवर्तक मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, खासदार रजनीताई पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील, आमदार जयकुमार गोरे, नगराध्यक्ष शारदा खिलारे, परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर आदी मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
चव्हाण म्हणाले, की मुलींच्या संरक्षणाला प्राधान्य देणारा हा नवोपक्रम असून, मुलींच्या संरक्षणासाठी कन्या सुरक्षा अभियान हाच रामबाण उपाय आहे. मलकापूरच्या विद्यार्थिनींसाठी मोफत एसटीबसची घराच्या दारात सोय झाल्याने मुलींविषयीची पालकांची काळजी निश्चितच काहीशी कमी होणार आहे. या वैशिष्टय़पूर्ण योजनेसाठी सेवाभावी संस्था व सहकारी संस्थांनी मदतीचा हात द्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावर व्यासपीठावरील कराड अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी यांनी कराड अर्बन बँकेतर्फे एक बस पुरविण्याची घोषणा केली. मलकापूर वेगाने वाढत असून, नावीन्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून हे शहर सर्वागसुंदर मॉडेल होत आहे. मलकापूर शहराची यशोगाथा देशभर सांगितली जात असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. मुलांचे कुपोषणाचे प्रमाण कमी नव्हेतर शून्य झाले पाहिजे आणि त्यासाठी गरोदर मातांना पोषक आहार व मुलांच्या जन्मानंतर २ वष्रे त्याची काळजी घेतल्यास कुपोषणाची लढाई जिंकता येईल असा विश्वास त्यांनी दिला. दुष्काळाला समर्थपणे तोंड देण्यास राज्यशासन यशस्वी ठरल्याचा दावा करताना, लोकसहभागातून छोटे प्रकल्प, विहिरी व तलावातून गाळ काढला गेल्याने पाणी साठवण क्षमता काहीशी वाढल्याचे समाधान चव्हाण यांनी व्यक्त केले.
मनोहर शिंदे यांनी मलकापूरमध्ये राबविण्यात येत असलेल्या सर्व नावीन्यपूर्ण योजना, उपक्रम व कार्यक्रमाचे संकल्पक दस्तुरखुद्द मुख्यमंत्रीच असल्याचे सांगताना, राष्ट्रीय स्तरावरीलही प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविलेल्या मलकापूरची ओळख एक आगळेवेगळे कार्य साध्य करणारी नगरपंचायत म्हणून करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. आता पाणंदमुक्त मलकापूरचा निर्धार असून, स्थानिक स्वराज्य संस्थेमधील एक नगरपंचायत नवोपक्रमातून काय करू शकते हे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही दाखवून द्यायचे असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
सतेज पाटील म्हणाले, की ‘मलकापूर विकासाचे मॉडेल’ ही चित्रफीत तयार करून ती देशभर दाखवली गेली पाहिजे. राजकारण कमी आणि भरघोस विकास करणाऱ्या मनोहर शिंदे यांना आमच्या कोल्हापूर महापालिकेत पदाधिकारी म्हणून घ्यावे लागेल, तरच आम्हाला नावीन्यपूर्ण योजना व नियोजनबद्ध विकास साधता येईल, असा गुणगौरव त्यांनी केला.
डॉ. सविता मोहिते यांनी महाराष्ट्राच्या भल्यासाठी पृथ्वीराज चव्हाण हेच मुख्यमंत्री म्हणून दीर्घकाळ राहावेत अशी अपेक्षा व्यक्त करताना, त्यासाठी सर्वानी गणपती पाण्यात ठेवावा, असा मुख्यमंत्र्यांचा गौरव केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा