गेल्या काही दिवसांपासून शिंदे गट आणि शिवसेना यांच्या ‘धनुष्यबाण’ चिन्हावरून संघर्ष सुरू होता. हा वाद सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर चिन्हाबाबतचा निर्णय निवडणूक आयोग घेणार असल्याचे न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले. त्यानुसार काल निवडणूक आयोगाने ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह तात्पुरता स्वरुपात गोठवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या निर्णयावरून सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेची भूमिका मांडणारे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगावर टीका केली आहे.

हेही वाचा – निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर दीपक केसरकरांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात; म्हणाले, “धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याला…”

काय म्हणाले कपिल सिब्बल?

“निवडणूक आयोगाने फक्त शिवसेनेचं नाव आणि चिन्हंच गोठवलं नाही, तर देशातील लोकशाहीदेखील गोठवली आहे. ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे आहे. तर, संधीसाधू लोकांचा शिंदे गट हा भाजपाची सेवा करणारा गट आहे”, अशी प्रतिक्रिया कपिल सिब्बल यांनी दिली आहे.

हेही वाचा – विश्लेषण : शिवसेनेचं ‘धनुष्यबाण’ चिन्ह निवडणूक आयोगानं का गोठवलं?

निवडणूक आयोगावरही केली टीका

“निवडणूक आयोग हे फक्त स्वतंत्र असल्याचं दाखवते. मात्र, ते केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर काम करतात, अशा संस्थेची लाज वाटते”, असेही सिब्बल म्हणाले.

दरम्यान, निवडणूक आयोगाने काल ‘धनुष्यबाण’ चिन्ह तात्पुरते गोठवण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी अंधेरी पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांनाही नवी निशाणी देण्यात येणार आहे. याबरोबच दोन्ही गटाला शिवसेना हे नावही वापरता येणार नाही, असेही आयोगाकडून सांगण्यात आले आहे.