कराड : कराड शहरातील बांधकाम परवान्यासाठी १० लाखांच्या लाचेची मागणी करून पाच लाखांचा पहिला हप्ता स्वीकारताना सहायक नगररचनाकारासह दोघांना सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले होते. याप्रकरणी नुकत्याच बदली झालेल्या मुख्याधिकारी शंकर खंदारेंसह चौघांवर शहर पोलिसांत गुन्हा दाखल आहे.

दरम्यान, पसार झालेल्या शंकर खंदारेंनी अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. बी. पतंगे यांनी फेटाळला आहे. अतिरिक्त सरकारी वकील ॲड्. आर. डी. परमाज याबाबतची माहिती देताना म्हणाले, कराडमधील बांधकाम व्यावसायिक तक्रारदाराचे पाच मजली इमारतीचे काम प्रस्तावित आहे. त्यांनी बांधकाम परवानगीसाठी २०१७ मध्ये नगरपालिकेकडे अर्ज केला होता.

नियमावलीतील बदलाप्रमाणे सुधारित बांधकाम परवानगीसाठी २०२३ मध्ये पुन्हा अर्ज केला. दरम्यान, सहायक नगररचनाकार स्वानंद शिरगुप्पे यांनी खासगी इसम अजिंक्य देव याच्या समवेत तक्रारदाराला दोन हजार चौरस फूट वाढीव चटईक्षेत्र मिळणार असल्याचे सांगून, बाजारभावाप्रमाणे या मिळकतीच्या ८० लाखांपैकी दहा ते बारा टक्के म्हणजेच १० लाख रुपयांच्या लाचेची मागणी पंचासमक्ष केली होती.

बदली झालेले मुख्याधिकारी शंकर खंदारे, सहायक नगररचनाकार स्वानंद शिरगुप्पे, पालिका कर्मचारी तौफिक शेख आणि खासगी इसम अजिंक्य देव यांनी संगनमताने तक्रारदाराकडे लाचेच्या रकमेपैकी पहिला हप्ता म्हणून पाच लाखांच्या लाचेची मागणी केली आणि ती स्वीकारताना शिरगुप्पे व शेख पकडला गेला. तर, खंदारे पसार झाले होते. खंदारेंनी जिल्हा व सत्र न्यायाधीश पतंगे यांच्या न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. त्यावर युक्तिवाद होऊन न्या. डी. बी. पतंगे यांनी शंकर खंदारेंचा अटकपूर्व जामीन फेटाळल्याचे सरकारी वकील आर. डी. परमाज यांनी सांगितले.