कराड: व्यावसायिकास बांधकाम परवाना देण्यासाठी १० लाख रुपयांच्या लाचेची मागणी करत त्यातील पाच लाखांचा पहिला हप्ता खासगी इसमाच्या सांगण्यावरून स्वीकारताना, मुख्याधिकारी शंकर खंदारे यांच्यासह नगररचना विभागाचे सहाय्यक नगररचनाकार व बांधकाम विभागाच्या कनिष्ठ लिपीकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारच्या पथकाने सोमवारी रात्री कारवाई केली.
कराड नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदावरून नुकतेच पायउतार झालेले शंकर खंदारे, नगररचना विभागातील सहाय्यक नगररचनाकार स्वानंद दिलीप शिरगुप्पे (सध्या रा. कराड, मूळ रा. कोडोली, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर), बांधकाम विभागातील कनिष्ठ लिपिक तौफीक कय्यूम शेख (४० रा. कार्वे नाका, कराड), खासगी इसम अजिंक्य अनिल देव अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत.
याबाबतची माहिती अशी की, तक्रारदार हे बांधकाम व्यावसायिक असून, त्यांचे शहरातील सिटी सर्व्हे क्रमांक ७९ सोमवार पेठ येथे वाहनतळ (पार्किंग) व पाच मजली इमारतीचे काम प्रास्तावित आहे. तक्रारदारांनी बांधकाम परवान्यासाठी २०१७ साली कराड नगरपरिषदेकडे प्रस्ताव देवून त्याची मुदतवाढ २०१९ पर्यंत घेतली. मात्र, सदरचे काम सुरू न झाल्याने २०२१ मध्ये सुधारीत परवानगी मिळाली. दरम्यान, नियमावलीत बदल झाल्याने सुधारीत बांधकाम परवाना मिळणेबाबत सन २०२३ मध्ये अर्ज दाखल होता. या परवानगीसाठी तक्रारदारांनी सहाय्यक नगररचनाकार स्वानंद शिरगुप्पेकडे पाठपुरावा केला. त्यांनी खासगी इसम अजिंक्य देवच्या समवेत तक्रारदारांना भेटवून त्यांचे कामात दोन हजार चौरस फूट वाढीव चटईक्षेत्र (एफएसआय) इतकी मिळकत असल्याने बाजार भावाप्रमाणे मिळकतीची किमत अंदाजे ८० लाखांपैकी १०-१२ टक्के रक्कम म्हणजे १० लाखांच्या लाच पंचासमक्ष मागणी केली.
अजिंक्य देवकडून प्राप्त फाईलवरून स्वानंद शिरगुप्पे व तौफिक शेखच्या मदतीने बांधकाम परवान्यासाठी आवश्यक चलन स्वानंद शिरगुप्पेचे व्हॉटस्ॲपवरून स्वतःच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर घेऊन मागील तारखेच्या चलनावर स्वाक्षऱ्या करून पुन्हा स्वानंद शिरगुप्पेच्या भ्रमणध्वनीवर परत पाठवून लाच घेण्यास पोषक वातावरण तयार करून लाच मागणीसाठी प्रोत्साहन दिले. शिरगुप्पेने देवच्या मार्फत तक्रारदाराकडे लाच मागणी करून प्रोत्साहन दिले. तसेच तौसिफ शेखने शिरगुप्पेच्या सांगणेवरून मुख्याधिकारी शंकर खंदारे कार्यमुक्त झाल्यानंतरही त्यांच्या नावाचे स्वाक्षरीसाठी चलन बनवून ते पाठीमागील तारखेस जावक करून अजिंक्य देवचे सांगणेवरून १० लाखांच्या लाचेच्या मागणीतील पहिल्या हप्त्याची पाच लाखांची रक्कम स्वीकारली. अजिंक्य देवने मुख्याधिकारी खंदारे व स्वानंद शिरगुप्पेंसाठी लाचेची मागणी करून शिरगुप्पेच्या सांगणेवरून तक्रारदारांना वेळोवेळी लाच मागणी करून प्रोत्साहन दिले.
या चौघांनी तक्रारदारांना त्यांचे प्रलंबित प्रस्तावासाठी आपल्या पदाचा गैरवापर करीत लाच मागणी करून, प्रोत्साहन दिल्याबद्दल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सातारा पोलिसांनी ही कारवाई केली. कराड शहर पोलिसात हा गुन्हा दाखल झाला आहे. सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारचे पोलीस उपाधीक्षक राजेश वाघमारे, पोलीस निरीक्षक सचिन राऊत, श्रीधर भोसले व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपाधीक्षक राजेश वाघमारे करीत आहेत.