कराड : कराडची ग्रामदेवता कृष्णामाई मंदिराच्या तीन दरवाजांची कुलपे तोडून गाभाऱ्यातील तिजोरीतून ओवाळणी पात्रातील सुमारे सातशे रुपयांची नाणी व किरकोळ नोटा अशी रक्कम चोरट्याने चोरून नेली. कृष्णाघाट व तेथील कृष्णामाई मंदिरासह संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने येथील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच मंदिरांना मजबूत दरवाजांची गरज व्यक्त होत आहे. दरम्यान, संशयित ताब्यात असून, निश्चितपणे या गुन्ह्याची उकल होईल असा पोलिसांचा दावा आहे.

सोमवारी (दि. १७) पहाटे मंदिराचे पुजारी मंदिरात पूजेसाठी आल्यानंतर चोरीचा हा सारा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, याबाबत कोणीही तक्रार दिली नसल्याने गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे कराड शहर पोलीस ठाणे अंमलदारांनी सांगितले. तर, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक भापकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करायला संबंधित पुजारी कोणी भक्तगण, नागरिक पुढे येत नसल्याची अडचण आमच्या समोर आहे. वेळप्रसंगी आपण स्वतः १५१ कलमान्वये गुन्हा दाखल करून गुन्ह्याची उकल करणार असल्याचे भापकर यांनी सांगितले. काही संशयितांकडे चौकशीही सुरू आहे. गुन्हेगाराला नक्की जेरबंद करू, गुन्ह्याची उकल होईल असा विश्वासही भापकर यांनी या वेळी दिला आहे.

कृष्णामाई मंदिराचे पुजारी शरदचंद्र आवटे ‘लोकसत्ता’शी बोलताना म्हणाले की, ग्रामदैवता कृष्णामाई मंदिरात चोरी झाल्याची घटना सोमवारी (दि. १७) पहाटे मंदिराचे पुजारी, माझा मुलगा केदार पूजा करण्यासाठी आले असता त्याचे निदर्शनास आली. मंदिराच्या तीन दरवाजांची कुलपे तुटली असल्याचे आणि गाभाऱ्यातील लोखंडी कपाटात असलेल्या ओवाळणी पात्रातील पैसे नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

सुदैवाने चोरट्याने कृष्णामाईच्या गळ्यातील हार, मूर्तीसह भोवतीची पितळी प्रक्षावळ, दोन्ही समई, महादेवाची पिंड. त्यावरील महादेवाचा पितळी मुखवटा, पिंडीवरील पंचधातूचे नाग, गणपती मूर्ती व त्याभोवतीची पितळी प्रक्षावळ या सर्वाला चोरट्याने हातही लावल्याचे दिसत नाही. मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे चोरीचे असे किरकोळ प्रकार वारंवार होत असल्याचेही आवटे- पुजारी यांनी सांगितले.

दरम्यान, एक शाळकरी मुलगा काठीला चिंगम लावून मंदिराच्या दानपेटीतील नोटा व नाणी काढत असल्याचा प्रकार यापूर्वी घडल्याचे तसेच रात्रीच्या वेळी कृष्णाघाट परिसरात मादक पदार्थ सेवन करणाऱ्यांची  अनेकदा बैठक होत असल्याचे सांगण्यात आले.

Story img Loader