Kareena Kapoor Reaction on Attack on Saif Ali Khan : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान याच्यावर गुरुवारी मध्यरात्री भीषण हल्ला झाला. घरात शिरलेल्या चोराने त्याच्यावर चाकूहल्ला केला. त्यानंतर हल्लेखोर पसार झाला असून पोलिस त्याच्या मागावर आहे. दरम्यान, चोरीच्या उद्देशाने शिरलेल्या चोराने अलिशान घरातून काय काय चोरलं, याबाबतची माहिती अभिनेत्री करीना कपूर हिने दिली. तिने पोलीस जबाबात सर्वकाही स्पष्टपणे सांगितलं आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
सैफ अली खान वांद्र्याच्या सतगुरू शरण या इमारतीत राहतो. या इमारतीतील ११ आणि १२ व्या मजल्यावर त्याचं वास्तव्य आहे. त्याच्या या घरात गुरुवारी १६ जानेवारीच्या मध्यरात्री दोनच्या सुमारास चोर शिरला होता. इमारतीला कडक सुरक्षाव्यवस्था असतानाही तो त्याच्या घरापर्यंत पोहोचू शकला. सैफ अली खानच्या घरातील मदतनीसाला कोणीतरी घरात आल्याची चाहूल लागली. त्यामुळे तिने सैफ अली खानला उठवलं. त्याने त्या चोराला पकडलं खरं, पण चोरानेच सैफवर हल्ला केला. या हल्ल्यात सैफच्या पाठीच्या कण्यात चाकूचं टोक अडकलं. त्याच्या हाताला आणि मानेला खोल जखम झाली. त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली असून तो सध्या लीलावती रुग्णालयात डॉक्टरांच्या निगराणीखाली आहे. दरम्यान, हा हल्ला जिथे झाला तेथून जवळच असलेल्या खोलीत दागिने होते. हे दागिने सुरक्षित असल्याची प्रतिक्रिया सैफची पत्नी आणि अभिनेत्री करीना कपूरने दिली.
हेही वाचा >> “सैफच्या मुलाचाच बळी जाणार होता, पण…”, शरद पवार गटातील आमदाराचा मोठा दावा; म्हणाले, “सत्य सांगायला…”
करिना कपूरने पोलिसांच्या जबाबात काय नोंदवलं?
गुरुवारी रात्री करीनाने पोलिसांना जबाब दिला. या जबाबात तिने म्हटलं की, ” हल्ला करताना हल्लेखोर खूप आक्रमक झाला होता. त्याने सैफवर अनेकवेळा वार केले. त्यामुळे आम्ही लगेच १२ व्या मजल्यावर गेलो. आरोपीपासून काही अंतरावरच दागिनेही होते, पण त्यातील सर्व दागिने तेथेच आहेत.” या घटनेमुळे करीना कपूर इतकी घाबरली आहे की तिची बहीण करिश्मा कपूरने तिला तिच्या खार येथील घरी नेलं. त्यामुळे करिश्माच्या खार येथील निवासस्थानी पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.
कपड्यांवर रक्ताचे डाग, चालणेही मुश्कील
● अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर त्याचे कपडे रक्ताने माखले होते. त्यावेळी त्याला चालणेही कठीण होत होते, अशी माहिती सैफला रिक्षातून लीलावती रुग्णालयात नेणारा रिक्षाचालक भजन सिंहने दिली. भजन सिंह गुरुवारी पहाटे प्रवासी आणण्यासाठी वांद्रे परिसरातून जात होता. त्याच वेळी वांद्रे पश्चिम येथील सतगुरू शरण सिंह इमारतीखाली त्याची रिक्षाला थांबवण्यात आली.
● सैफच्या घरातील एका कर्मचाऱ्याने हात केला. त्यावेळी एक व्यक्ती जखमी असून त्यांना रुग्णालयात न्यायचे असल्याचे त्या व्यक्तीने सांगितले. जखमी व्यक्ती (सैफ), एक कर्मचारी आणि एक लहान मूल (तैमूर) माझ्या रिक्षात बसले आणि मला रुग्णालयात नेण्यास सांगितले, असे भजन सिंह यांनी सांगितले. खार (पूर्व) येथील पाइपलाइन रोडवर राहणारे भजन सिंह म्हणाले की, त्यांनी माणुसकीच्या नात्याने कुटुंबाकडून पैसे मागितले नाहीत.
● रिक्षातील प्रवासी घाईत होते आणि घाबरलेही होते. त्यामुळे मी पैसे मागण्याचाही विचार केला नाही. एवढा मोठा अभिनेता माझ्या वाहनात बसला, ही समाधानाची गोष्ट होती, असे भजन सिंह यांनी सांगितले.
© IE Online Media Services (P) Ltd