‘यंदाच्या आर्थिक वर्षांच्या समाप्तीपूर्वी कर्जत तालुक्याचा संपूर्ण चेहरामोहरा आकर्षकरित्या बदलेल आणि हा संपूर्ण परिसर जगातील एक सवरेत्कृष्ट ज्ञानकेंद्र असलेला सर्वाधिक विकसित परिसर म्हणून योजनाबद्धरित्या विकसित केला जाईल’, अशी ग्वाही जलसंपदामंत्री आणि रायगड जिल्ह्य़ाचे पालकमंत्री सुनील तटकरे यांनी दिली आहे.
कर्जत नगर परिषदेच्या वतीने जिल्हास्तरीय महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान आणि एमएमआरडीए यांच्या संयुक्त सहकार्यातून प्रस्तावित करण्यात आलेल्या विविध सोळा विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आला. यानिमित्ताने कर्जतच्या हुतात्मा कोतवालनगर परिसरात आयोजिण्यात आलेल्या जाहीर सभेमध्ये ते बोलत होते. कर्जतचे आमदार सुरेश लाड यांच्या अध्यक्षतेखाली आयोजिण्यात आलेल्या या जाहीर सभेच्या वेळी माजी  नगराध्यक्ष व एमएमआरडीएचे संचालक शरद लाड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कर्जतच्या नगराध्यक्षा सुनंदा कांगणे, उपनगराध्यक्ष राहुल डाळिंबकर, माथेरानचे  नगराध्यक्ष अजय सावंत, राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष तानाजी चव्हाण, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संतोष भोईर, नगरसेविका स्मिता पतंगे, शुभांगी जाधव, सुप्रिया चव्हाण आणि वंदना भोईर, कर्जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी नानासाहेब कामठे तसेच एकनाथ धुळे, उमेश गायकवाड, रामकृष्ण मोकल आदी अन्य मान्यवरदेखील व्यासपीठावर उपस्थित होते.
कर्जत नगर परिषदेच्या मागील निवडणुकीकरिता झालेल्या प्रचारसभेत कर्जत परिसराचा सर्वागीण विकास करण्याच्या देण्यात आलेल्या आश्वासनाची आता पूर्तता होत असल्यामुळे आपल्या मनामध्ये खचितच समाधानाची भावना असल्याचे सुनील तटकरे यांनी सांगितले. आजच्या या समारंभाच्या माध्यमातून सुमारे पावणेअकरा कोटी रुपयांच्या विकास योजना कार्यान्वित करण्यात येत असून, अलीकडच्या काळात कर्जत तालुक्याकरिता एकंदर सुमारे साडेतीनशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याचे ते म्हणाले. यासंदर्भात स्थानिक आमदार सुरेश लाड यांनी केलेल्या  प्रयत्नांची त्यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली. विधानसभेकरिता होणाऱ्या आगामी निवडणुकीकरिता सुरेश लाड यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणादेखील तटकरे यांनी केली. आपण मावळ लोकसभा मतदारसंघातून अथवा कर्जत विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आ. सुरेश लाड यांनी केलेल्या मागणीनुसार कर्जतमधील सर्वच शासकीय कार्यालये एकाच मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये आणण्याकरिता आणि कर्जतमध्ये संपूर्ण राज्यभरात सवरेत्कृष्ट म्हणून ओळखले जाईल असे आणि सर्वच अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेले भव्य नाटय़गृह बांधण्याकरिता येत्या सप्ताहाच्या आत ठोस स्वरूपाची कार्यवाही करण्याची आणि येत्या ऑगस्ट महिन्यात त्याकरिता आवश्यक त्या आर्थिक निधीची तरतूद करण्याची अतिशय महत्त्वपूर्ण घोषणादेखील सुनील तटकरे  यांनी या वेळी केली. कर्जत नगर परिषदेच्या नव्या इमारतीचे लोकार्पण करण्याकरिता केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना निमंत्रित करण्यात येणार असल्याचे त्यांनी घोषित केले.
पालकमंत्री सुनील तटकरे यांच्या सक्रिय सहकार्याच्या आधारे गेल्या काही वर्षांपासून स्वच्छ कर्जत, सुंदर कर्जत अशी मोहीम आपण नगर परिषदेच्या माध्यमातून हाती घेतली असून तिला चांगले यश प्राप्त झाले असल्याबद्दल आपल्याला निश्चितच समाधान वाटत आहे, असे प्रतिपादन आ. सुरेश  लाड यांनी या वेळी बोलताना केले. येत्या सहा महिन्यांच्या आत कर्जत परिसरात फार चांगले काम झालेले सर्वाना अनुभवास येणार असल्याची ग्वाही त्यांनी या वेळी दिली.
कर्जतमधील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राला योग्य ती पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी आणि त्या मध्यवर्ती जागेत प्रशासकीय इमारत आणि अत्याधुनिक सुसज्ज नाटय़गृह बांधण्याकरिता सहकार्य करण्याची विनंती सुरेश लाड यांनी सुनील तटकरे यांना केली. कर्जत तालुक्यातील कोंढाणे धरणाच्या कामाला पुन्हा प्रारंभ करण्याकरिता शक्य तितक्या लवकर अनुमती प्राप्त व्हावी, अशीही अपेक्षा त्यांनी या वेळी व्यक्त केली. मुरलीधर राणे यांनी या समारंभाचे सूत्रसंचालन केले. गणेशशेठ सोनी, रामकृष्ण मोकल, राजेंद्र पतंगे, सुरेंद्र पतंगे, स्मिता पतंगे यांच्यासह कोतवालनगरमधील अनेक मान्यवरांनी या वेळी सुनील तटकरे आणि सुरेश लाड यांचा विशेष सन्मान केला. कर्जतचे माजी नगराध्यक्ष धनंजय चाचड, उद्योजक बेडेकर यांच्यासह विविध क्षेत्रांमधील मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

Story img Loader