कर्जत : बीड जिल्ह्यातील चोरट्याने शेतकऱ्याची चोरी करून आणलेली तूर अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे बाजार समितीमध्ये विकली. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने मिरजगाव येथे येऊन व्यापाऱ्यावर कारवाई केल्यामुळे संतप्त व्यापाऱ्यांनी बाजार समितीचे लिलाव व सर्व व्यवहार दिवसभर बंद ठेवले. तसेच पोलिसांच्या कारवाईचा व्यापाऱ्यांच्या वतीने निषेध करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बीड, नगर, सोलापूर या जिल्ह्यातील शेतकरी शेतीमाल विक्री करण्यासाठी आणतात. यामुळे मोठी उलाढाल या बाजार समितीमध्ये होते. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यामधून एका चोरट्याने शेतकरी म्हणून मिरजगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तूर विकण्यासाठी आणली होती. व्यापाऱ्याने रीतसर पावती फाडून त्याची बाजार समितीमध्ये नोंद करून तूर खरेदी केली होती. मात्र, आज (दिनांक ५ फेब्रुवारी) सकाळी सात वाजता पोलीस पथक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डमध्ये आले व त्यांनी संबंधित व्यापाऱ्याला आपण खरेदी केलेली तूर चोरीची होती, असे म्हणत त्या व्यापाऱ्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १२ टन तूर खरेदी केलेली असताना प्रत्यक्षात २० टन तूर (किंमत एक लाख ४० हजार रुपये) तूर घेऊन गेले. यामुळे संतप्त झालेल्या व्यापाऱ्यांनी बाजार समितीचे लिलाव बंद पाडले व व्यापाऱ्यांना न्याय मिळावा अशी मागणी केली. आज दिवसभर शेतकऱ्यांच्या शेतीमालाची कोणतीही खरेदी विक्री होणार नाही असा निर्णय सर्व व्यापाऱ्यांनी घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठे आर्थिक नुकसान झाले.

यावेळी बोलताना सभापती काकासाहेब तापकीर म्हणाले की, बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणण्यात येणारे कोणतेही धान्य हे शेतकऱ्याचे असते. यामुळे विक्रीसाठी आणलेले धान्य हे चोरीची की शेतकऱ्याचे हे ओळखणे अवघड आहे. पोलीस प्रशासनाने व्यापाऱ्यावर कारवाई करण्यापूर्वी बाजार समितीच्या सभापती, संचालक मंडळ व बाजार समितीचे अधिकारी यांच्या समवेत चर्चा करण्याची गरज होती. मात्र दडपशाही करून पोलिसांनी व्यापाऱ्यावर केलेली कारवाई ही चुकीची असून बाजार समिती या पुढील काळात देखील व्यापाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. बाजार समितीमध्ये विक्री करण्यासाठी आलेल्या मालाची रीतसर पावती आणि पैसे दिले जातात. पोलिसांनी संबंधित चोरट्याकडूनच याची वसुली करावी व व्यापाऱ्याचे घेतलेले धान्य परत करावे. जर व्यापाऱ्यांनी प्रत्येक वेळी संपूर्ण तपासणी करून धान्य खरेदी करावयाचे ठरवले तर त्याचा त्रास सर्व शेतकऱ्यांना होईल. आणि त्याचा खरेदी विक्रीवर आणि बाजार समितीच्या व्यवहारावर देखील परिणाम होईल. यामुळे पोलीस प्रशासनाने या पुढील काळामध्ये कर्जत तालुक्यातील बाजार समिती संदर्भात असणाऱ्या कायदेशीर बाबी बाबत परस्पर कोणत्याही व्यापाऱ्यांवर कारवाई करू नये. अन्यथा याबाबत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांना याबाबत माहिती देऊन संबंधितांवर कारवाई करण्यासाठी भाग पाडू असा इशारा काकासाहेब तापकीर यांनी दिला आहे. यावेळी बाजार समितीचे संचालक लहू वतारे व व्यापारी उपस्थित होते.