कर्जत : नगरपंचायत नगराध्यक्षांवरील अविश्वास ठरावासाठी आज, सोमवारी विशेष सभा बोलवण्यात आली. मात्र सभेपूर्वीच नाट्यमय घडामोडीतून नगराध्यक्ष उषा राऊत यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सकाळी राजीनामा दिला. त्यामुळे त्यांच्यावरील अविश्वास प्रस्तावावर विशेष सभा घेण्याची गरजच भासली नाही. पीठासन अधिकारी नितीन पाटील यांनी ही माहिती दिली. त्यानंतर सभेस उपस्थित असणारे १३ नगरसेवक पुन्हा एकदा तीर्थयात्रेला निघून गेले आहेत. आता नवीन नगराध्यक्ष कोण होणार, याकडे लक्ष लागले आहे.

नगरपंचायत निवडणुकीत आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी व काँग्रेसचे १५ नगरसेवक विजयी झाले होते. विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भाजपला अवघ्या दोन जागा मिळाल्या होत्या. यानंतर राष्ट्रवादीच्या उषा राऊत यांची नगराध्यक्षपदी, काँग्रेसच्या रोहिणी घुले यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाली. स्पष्ट बहुमत मिळूनही रोहित पवार यांनी काँग्रेसला उपनगराध्यक्ष पद दिले होते. मात्र, राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) ८, काँग्रेसचे ३ व भाजपचे २ अशा १३ नगरसेवकांनी नगराध्यक्षांविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला. या प्रस्तावावर आज विशेष सभा बोलावली होती.

राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी संतोष मेहत्रे व अमृत काळदाते, तर उपगटनेतेपदी सतीश पाटील व प्रतिभा भैलूमे यांनी दावा केला होता. यामुळे कोणाचा व्हिप अधिकृत मानला जाणार याविषयी चर्चा होती. सभा सकाळी १२ वा. होती, तत्पूर्वी ९.३० वा अहिल्यानगर शहरात जिल्हाधिकाऱ्यांकडे राजीनामा सादर केला, त्यांनी तो लगेच १०.३० मंजूर केला आणि पिठासन अधिकारी नितीन पाटील यांना नगराध्यक्षांचा राजीनामा मंजूर केल्याची माहिती दिली.

दरम्यान, अविश्वास प्रस्ताव दाखल करणारे १३ नगरसेवक एका खासगी गाडीने पोलीस बंदोबस्तात नगरपंचायत कार्यालयाच्या परिसरामध्ये आले. त्यावेळी त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. सभागृहात पीठासन अधिकारी नितीन पाटील यांनी, सभेचे कामकाज सुरू करतानाच जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र नगरसेवकांना वाचून दाखवले. त्यामध्ये नगराध्यक्ष उषा राऊत यांनी आपल्याकडे आज सकाळी पदाचा राजीनामा सादर केला आहे व तो राजीनामा अंमलात आला आहे. त्यामुळे अविश्वास प्रस्तावावर आता मतदान घेण्याची किंवा इतर कोणतीही चर्चा करण्याची आवश्यकता नाही, असे नमूद केल्याचे उपस्थित नगरसेवकांना सांगितले.

राम शिंदेंकडून पैसा व सत्तेचा गैरवापर

पत्रकारांशी बोलताना नगराध्यक्ष उषा राऊत म्हणाल्या, माझ्या विरोधात विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी पैसा व सत्तेचा गैरवापर केला. मी ओबीसी नगराध्यक्ष असताना मला पदावरून काढण्यासाठी राम शिंदे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत नवीन कायदा केला आणि एका ओबीसी नगराध्यक्षांचा राजकीय बळी घेतला.

उपनगराध्यक्ष रोहिणी घुले राजीनामा देणार

पत्रकारांशी बोलताना गटनेते संतोष मेहत्रे म्हणाले, अद्याप कोण नगराध्यक्ष होणार हे ठरलेले नाही. राम शिंदे याबाबत निर्णय घेणार आहेत. फुटलेले नगरसेवक भाजप सोबत जाणार का, अशी विचारणा केली असता श्री. मेहेत्रे म्हणाले, शहरातील जनतेचा विचार करून निर्णय घेण्यात येईल. उपनगराध्यक्ष रोहिणी घुले दोन दिवसात राजीनामा देतील.

नगराध्यक्ष निवडीसाठी पुन्हा सभा

श्रीमती उषा राऊत यांनी नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता पुन्हा एकदा नगराध्यक्ष निवडीची अधिसूचना नव्याने काढली जाईल. यामुळे आता कोण नगराध्यक्ष होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.