सांगली : महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या इस्लामपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय आणि नॅशनल युनिव्हर्सिटी फिलीपिन्स यांच्यात आंतरराष्ट्रीय सामंजस्य करार करण्यात आला. या कराराद्वारे दोन्ही संस्थांमध्ये शैक्षणिक व संशोधन सहकार्य वाढवले जाईल. उच्च शिक्षण, संशोधन, मानसिक आरोग्य, स्त्री सबलीकरण, कौशल्यविकास, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम यांसारख्या क्षेत्रांमध्ये नव्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा करार महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

या कराराअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक देवाण-घेवाण, संयुक्त संशोधन प्रकल्प, परिषदा व कार्यशाळांचे आयोजन, मानसशास्त्र व मानसिक आरोग्यविषयक अभ्यासक्रम तसेच स्त्री सबलीकरण, तंत्रज्ञान आणि उद्योजकता कौशल्यविकास उपक्रम राबवले जाणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधन व करिअरच्या संधी मिळतील आणि प्राध्यापकांना अध्यापन व संशोधनाच्या क्षेत्रात जागतिक अनुभव मिळेल.

या सामंजस्य कराराच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रा. डॉ. मिलिंद बाबासो देशमुख (सहायक प्राध्यापक, मानसशास्त्र विभाग) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. करार करण्यासाठी संस्थेच्या सचिव श्रीमती सरोज पाटील, अध्यक्ष ॲड. एन. आर. पाटील, उपाध्यक्ष सुनील पाटील, व्यवस्थापन परिषदेच्या सदस्या संगीता पाटील, प्रशांत पाटील, डॉ. घनशाम कांबळे, प्राचार्य डॉ. नितीन शिंदे यांचे सहकार्य लाभले.

Story img Loader