Conductor assault for not speaking Marathi: कर्नाटक राज्य परिवहन मंडळाच्या बसच्या कंडक्टरला बेळगावमध्ये मराठी बोलण्याच्या कारणावरून शुक्रवारी मारहाण करण्यात आली आहे. दोन विद्यार्थी मराठी बोलत होते, त्यांनी कंटक्टरला कन्नडऐवजी मराठी बोलण्यास सांगितले. त्यानंतर बाचाबाची झाल्यामुळे त्याचे पर्यवसन हाणामारीत झाले. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा परिसरात भाषिका वाद नवा नाही. आता ताज्या प्रकरणानंतर आंतरराज्यीय बस सेवा तात्पुरती खंडीत करण्यात आली आहे. बेळगावहून महाराष्ट्राला जाणाऱ्या बस आता सीमेजवळ असलेल्या कोगनोली चेकपॉईंटपर्यंत धावत आहेत. तर महाराष्ट्रातून कर्नाटकला जाणाऱ्या बसेस कागल तालुक्यापर्यंत सेवा देत आहेत.
शनिवारी महाराष्ट्रातील बस चालकाला कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे कन्नड बोलण्यावरून मारहाण करण्यात आली. तसेच बसला आणि चालकाच्या तोंडाला काळे फासण्यात आले. त्यानंतर हा वाद उफाळला होता. या घटनेला प्रत्युत्तर म्हणून शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकात उभ्या असलेल्या कर्नाटकच्या बसेसना काळे फासले आणि भगवे झेंडे बांधले.
शुक्रवारी घडलेल्या घटनेत तीन पुरूषांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच त्यांच्याबरोबर असलेल्या अल्पवयीन मुलीलाही ताब्यात घेतले. केएसआरटीसी बसचा वाहक मराठीत बोलत नसल्यामुळे त्यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर अल्पवयीन मुलीने वाहकाविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली. त्यामुळे वाहकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
बेळगाव तालुक्यात शुक्रवारी दुपारी ही घटना घडली होती. केएसआरटीसीचे कंडक्टर महादेव हुक्केरी (५१) यांनी बसमधून प्रवास करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना मराठीऐवजी कन्नडमध्ये बोलण्यास सांगितले. मला मराठी समजत नाही, असे उत्तर वाहकाने दिल्यानंतर प्रवासी आणि कंटक्टरमध्ये वाद निर्माण झाला. या घटनेनंतर कर्नाटकमध्ये शुक्रवारी तणावाने वातावरण निर्माण झाले. या घटनेची माहिती पसरताच कर्नाटक नव निर्माण सेनेचे कार्यकर्ते शनिवारी बस स्थानकावर गेले आणि त्यांनी महाराष्ट्रातून आलेल्या बसेसची तोडफोड करत बसेसवर असलेल्या मराठी मजकूराला काळे फासले.
महादेव हुक्केरी यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी संवाद साधला. ते म्हणाले, मी बसमध्ये तिकीट फाडत होतो. बसमध्ये अधिकतर महिला प्रवाशी होत्या. कर्नाटकमध्ये महिलांना बस प्रवास मोफत आहे. एक मराठी जोडपेही प्रवास करत होते. त्या महिलेने दोन मोफत तिकीट देण्यास सांगितले. पण मी एकच तिकीट देणार असल्याचे सांगितल्यानंतर त्यांनी मराठी बोलण्यावरून वाद घातला. मला मराठी समजत नाही, असे सांगितल्यानंतर बसमधील सात ते आठ प्रवाशांनी मला मारहाण केली.
हुक्केरी यांच्यावर बेळगावमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतल्यानंतर आज न्यायालयाने तीन जणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. तर अल्पवयीन मुलीला सुधारगृहात पाठवले.