सोलापूर : Karnataka Vidhan Sabha Election Results 2023 कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने मिळविलेल्या स्पष्ट बहुमतामुळे सोलापुरातील काँग्रेसमध्ये नवी उमेद वाढली आहे. विशेषतः सोलापूरशी दैनंदिन संबंध असलेल्या सीमावर्ती भागातील विजापूर आणि कलबुर्गी जिल्ह्यात काँग्रेसने देदैप्यमान कामगिरी बजावल्यामुळे सोलापुरात काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
विजापूर आणि कलबुर्गी हे दोन्ही कर्नाटकातील ऐतिहासिक जिल्हे सोलापूरलगत आहेत. या दोन्ही जिल्ह्यातील नागरिक बाजारपेठ खरेदीपासून ते वैद्यकीय उपचारापर्यंत सोलापूरशी पिढ्यानपिढ्या संबंध बाळगून आहेत. सोलापूरच्या लिंगायतांसह अन्य कन्नड भाषक समाजासह मुस्लीम समाजाचे नातेसंबंध या दोन्ही जिल्ह्यांमध्ये कायम आहेत. त्यामुळे या भागातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक घडामोडींविषयी सोलापूरकरांना नेहमीच उत्सुकता असते. सीमा भागातील कोणत्याही निवडणुकीत एकमेकांच्या मदतीसाठी धावून जाण्याची परंपरा आहे.
नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सोलापुरातील विविध राजकीय नेते, कार्यकर्ते आणि नातेवाईकांनी संबंधित पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार केला होता. कलबुर्गी व विजापूर या दोन्ही जिल्ह्यात काँग्रेसने घवघवीत यश मिळाले आहे. दक्षिण सोलापूरला खेटून असलेल्या इंडी (जि. विजापूर) मतदारसंघात काँग्रेसचे यशवंतगौडा पाटील तिसऱ्यांदा विजयी झाले. नागठाणमध्ये अशोक कटकधोंड (काँग्रेस), बबलेश्वरमध्ये एम. बी. पाटील (काँग्रेस) असे मिळून विजापूर जिल्ह्यात ८ पैकी ६ जागा काँग्रेसने मिळविल्या आहेत. तर भाजपने विजापूर शहरातील बसवनगौडा पाटील यांच्या माध्यमातून एकमेव जागा राखली आहे. जनता दलाला (धर्मनिरपेक्ष) देवर हिप्परगीच्या एकमात्र जागेवर समाधान मानावे लागले.
हेही वाचा >>> सांगली : देश पादाक्रांत करणारे दक्षिण भारतातून हद्दपार-जयंत पाटील
कलबुर्गीतही ९ पैकी ७ जागा काँग्रेसला मिळाल्या आहेत. यात आळंद, अफझलपूर आणि कलबुर्गी शहराशी सोलापूरकरांचा दैनंदिन संबंध असल्यामुळे तेथील विधानसभा निवडणुकीविषयी सार्वत्रिक उत्सुकता होती. कलबुर्गीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या चिरंजीवासह फातीमा कनिस हे विजयी झाले. आळंदमध्ये तब्बल ३२ वर्षांनी काँग्रेसला विजय मिळविता आला. या पक्षाचे ज्येष्ठ नेते बी. आर. पाटील यांनी भाजपचे सुभाष गुत्तेदार यांना पराभूत केले. तर फझलपुरातही काँग्रेसचे एम. वाय. पाटील यांनी भाजपचे मलिकय्या गुत्तेदार आणि त्यांचे पुतणे नितीन व्यकय्या गुत्तेदार या दोघांना आस्मान दाखविले. यात आळंद आणि अफझलपूर भागातील गुत्तेदार बंधुंचे वर्चस्व संपुष्टात आले आहे.