धरणातून सोडलेल्या एक टीएमसी पाण्याबाबत शिवतारे अनभिज्ञ
‘कर्नाटकसाठी पुन्हा पाण्याचा एक थेंबही देणार नाही,’ असे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी चार दिवसांपूर्वी सांगलीत जाहीर केले असतानाच सोलापूर, अक्कलकोटला पाणी देण्याच्या बदल्यात बुधवारपासून कोयना व वारणा धरणातून कर्नाटकसाठी अतिरिक्त एक टीएमसी पाणी सोडण्यात आले. यापूर्वी २५ एप्रिल रोजी कर्नाटकसाठी एक टीएमसी पाणी देण्यात आले होते.
अर्धा सांगली जिल्हा पाण्यासाठी टाहो फोडत असताना व सुमारे तीन लाख लोक टँकरच्या पाण्यावर आपली तहान भागवत असताना कर्नाटकसाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. उभय राज्यांच्या पाटबंधारे अधिकाऱ्यांच्या संयुक्त बठकीत अक्कलकोटसाठी १ टीएमसी पाणी देण्याच्या बोलीवर २५ एप्रिल रोजी कोयना व वारणा धरणातून १ टीएमसी पाणी सोडण्यात आले. या पाण्याचा हिशेब राजापूर बंधाऱ्याच्या ठिकाणी करण्यात आला. ३० एप्रिल रोजी हे पाणी सोडणे बंद करण्यात आले. मात्र, चार दिवसांत पाणी हिप्परगा धरणापर्यंत पोहोचलेच नाही. यामुळे पुन्हा एक टीएमसीची मागणी कर्नाटकच्या पाटबंधारे विभागाने केली होती. यावेळी जलसंपदा मंत्री विजय शिवतारे सांगलीत होते. त्यावेळी त्यांनी,‘ कर्नाटकसाठी पाण्याचा एक थेंबही सोडला जाणार नाही,’ असे सांगितले होते. मात्र कर्नाटकला सोलापूरला पाणी देण्याच्या हमीवर पुन्हा एक टीएमसी जादा पाणी देण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवरून घेण्यात आला. खुद्द राज्यमंत्री शिवतारे या निर्णयाबाबत अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे.
दोन टीएमसी पाण्यासाठी करार
सोलापूर व अक्कलकोटमध्ये तीव्र पाणी टंचाई असल्याने नारायणपूर धरणातून इंडी कालव्याद्बारे दोन टीएमसी पाणी मागणीनुसार देण्याचा करार उभय राज्याच्या पाटबंधारे खात्याअंतर्गत करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या करारानुसार कर्नाटकसाठी बुधवारपासून कोयना व वारणा धरणातून आणखी एक टीएमसी पाणी सोडण्यात येत आहे. हे पाणी येत्या चार दिवसांत कर्नाटक हद्दीवर असलेल्या कोल्हापूर जिल्ह्य़ातील राजापूर बंधाऱ्यातून सोडण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा