सांगली : अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याच्या कर्नाटकच्या हट्टाला विरोध करण्यासाठी सांगली, कोल्हापूरमध्ये बंद पाळण्याचा निर्णय सांगलीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अरूण लाड यांनी आयोजित केलेल्या या बैठकीकडे पूरग्रस्त भागातील खासदार वगळता अन्य लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवली.
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी अलमट्टी धरणाची उंची ५ मीटरने वाढवून ५२४ मीटर करण्यात येईल असे सांगत तसा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविला असल्याचे सांगितले. उंचीवाढ करण्यास कृष्णा खोरे पाणी वाटप लवादाने यास मान्यता दिली असल्याचेही शिवकुमार यांनी सांगितले आहे. याबाबत विचारविनिमय आणि पुढील दिशा निश्चित करण्यासाठी या बैठकीचे आयोजन आ. लाड यांनी केले होते.
यावेळी बोलताना सांगलीचे खासदार विशाल पाटील म्हणाले, अलमट्टी धरणाची उंचीवाढ झाली तर धरणातील पाण्याचा फुगवटा वाढणार असून याचा फटका सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावे व शेतींला बसणार आहे. ‘बँक वॉटर’मुळे पावसाळ्यात नदीला आलेल्या पुराच्या पाण्याचा निचरा होण्यास वेळ लागणार असून याचा मोठा फटका कृष्णासह वारणा, पंचगंगाकाठी असलेल्या गावांना व शेतीला बसणार आहे. महाराष्ट्र शासनाने याचा विचार करून या उंचीवाढीला विरोध करायला हवा.
यावेळी उपस्थित असलेले तासगाव-कवठेमहांकाळचे आमदार रोहित पाटील यांनीही याबाबत संघर्ष करावा लागला तरी आपण सोबत राहू असा विश्वास दिला. बैठकीचा आढावा घेऊन निमंत्रक आ. लाड म्हणाले, की कर्नाटकचे उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी कृष्णा खोरे पाणी वाटप लवादाने यास मान्यता दिल्याचा दावा केला आहे. वास्तविक पाहता लवादाने महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यांना विश्वासात न घेता कर्नाटकला पाच मीटरने अलमट्टीची उंची वाढविण्यास परवानगी कशी दिली? हा आमचा सवाल आहे.
कृष्णा खोरे पाणी वाटप लवादाप्रमाणे केंद्र सरकारची मान्यता असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेऊन अलमट्टीची उंची वाढविण्याच्या प्रस्तावास विरोध केला पाहिजे, असे आमचे म्हणणे आहे. याचे कारण असे की, ‘बॅक वॉटर’चा फटका प्रामुख्याने महाराष्ट्राला बसतो. यासाठी सन २०१७, २०१९ व २०२२ ला आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी यांसारख्या शहरांचे तसेच नदीकाठावरील गावांचे झालेले नुकसान यांचा अहवाल केंद्र सरकारकडे सादर केला पाहिजे.
पावसाळ्यातील महापुराची तीव्रता कमी करण्यासाठी नदीजोड प्रकल्प तातडीने राबवून हे महापुराचे पाणी दुष्काळी भागामध्ये वळविणे गरजेचे आहे. कृष्णा खोरे पाणी वाटप लवादाने पूर्वी केलेल्या पाणी वाटपाच्या निर्णयामध्ये बदल करण्याची गरज असून भविष्यामध्ये नदीजोड प्रकल्पासाठी लागणाऱ्या अतिरिक्त पाण्याचा विचार होणे गरजेचे आहे. म्हणून महाराष्ट्राने लवादाचा यापूर्वीचा पाणीवाटप निर्णय रद्द करून नवीन पाणीवाटप करार झाला पाहिजे, असा अट्टाहास करावा.
अलमट्टी धरणाची उंची वाढविण्यास विरोध करण्यासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात एक दिवस बंद पाळण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. या बंदची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल असे आ. लाड यांनी सांगितले. दरम्यान, या बैठकीस महापुराचा धोका असणाऱ्या गावातील लोकप्रतिनिधींनी कळवूनही त्यांनी अनुपस्थिती दर्शवली.