सीमाभागातील मराठी माणसांवर कर्नाटक पोलिसांकडून अत्याचार सुरू असून, यावर राज्यशासन ठोस भूमिका घेत नाही. मात्र, हा अत्याचार मराठी जनता सहन करणार नाही. संपूर्ण शिवसेना सीमावासीय मराठी बांधवांच्या पाठीशी ठाम असल्याची ग्वाही देताना, मराठी माणसांवरील अत्याचार कर्नाटक सरकारने तत्काळ थांबवावा, अन्यथा त्याचे तीव्र पडसाद उमटतील, असा इशारा शिवसेनेचे आमदार दिवाकर रावते यांनी दिला.
येळ्ळूर येथील घटनेच्या निषेधार्थ शिवसेनेतर्फे निषेध मोर्चा काढून आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या; त्या वेळी ते बोलत होते. सेनेचे जिल्हाप्रमुख हर्षद कदम, नरेंद्र पाटील, कोल्हापुरातील शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर, कोल्हापूरचे सेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, सांगली जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, नितीन काशीद यांच्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्य़ातील शिवसैनिक मोठय़ा संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. विजय दिवस चौक ते तहसीलदार कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला. भगव्या झेंडय़ाबरोबरच काळे झेंडे दाखवून कर्नाटक पोलिसांच्या निषेधाच्या घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला होता.
रावते म्हणाले, की सीमावाद सर्वोच्च न्यायालयात आहे. मात्र, राज्यशासनाने न्यायालयात पाठपुरावा केलेला नाही. ते या प्रश्नावर तोडगा काढण्यात अपयशी ठरले आहेत. तरी काँग्रेस शासन उलथून टाकल्याखेरीज सीमावादावर सकारात्मक व ठोस निर्णय होणार नाही.
सीमाभागातील अत्याचाराचे पडसाद उमटतील – रावते
सीमाभागातील मराठी माणसांवर कर्नाटक पोलिसांकडून अत्याचार सुरू असून, यावर राज्यशासन ठोस भूमिका घेत नाही. मात्र, हा अत्याचार मराठी जनता सहन करणार नाही.
First published on: 29-07-2014 at 04:00 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karnataka government immediately stop torture on marathi people ravate