अक्कलकोट तालुक्यातील कुडल येथे कर्नाटक सीमेवर भीमा नदीच्या पात्रात वाळू उपसा होऊन झालेल्या मोठय़ा डबक्यात पाण्यात बुडून कर्नाटकातील तिघा मुलींचा मृत्यू झाला. तिघा मृतांच्या वारसदारांना तत्काळ शासकीय मदत मिळावी या मागणीसाठी दीडशेजणांच्या संतप्त जमावाने अक्कलकोट तहसीलदारांची गाडी जाळून टाकली. शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास हा प्रकार घडला असून याप्रकरणी संबंधित जमावाविरुध्द अक्कलकोट पोलीस   ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत चालू होते.
अक्कलकोट तालुक्यात कुडल येथून भीमा नदी वाहते. नदीच्या पलीकडे कर्नाटकाची हद्द असून तेथे गुब्याळ (ता. इंडी, जि. विजापूर) नावाचे गाव आहे. या  गावातील १२ ते १३ वर्षे वयोगटाच्या भाग्यश्री बसण्णा सुतार, भाग्यश्री सिद्राम धुळे व महानंदा अतनूर या तिघी मुली नदीच्या पात्रात कपडे धुण्यासाठी उतरल्या होत्या. परंतु नदीच्या पात्रातून होणा-या वाळूच्या भरमसाठ उपशामुळे प्रचंड प्रमाणात खड्डे तयार झाले आहेत. पाणी साचलेल्या या खड्डय़ांचा अंदाज न आल्याने तिघी मुली पाण्यात पडून बुडाल्या. नंतर त्यांना बाहेर काढले असता तिघींचा मृत्यू झाला होता. ही दुर्घटना कळताच कर्नाटकातील मृत मुलींच्या नातेवाईकांचा जमाव धावून आला. वाळूचा बेसुमार उपसा झाल्यानेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप मृत मुलींच्या नातेवाईकांनी केला. मृतांच्या वारसदारांना महाराष्ट्र शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी त्यांची मागणी होती. आर्थिक मदत मिळाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा इशारा देण्यात आल्यामुळे परिस्थिती चिघळली. त्यामुळे अखेर अक्कलकोटचे तहसीलदार गुरूलिंग बिराजदार यांनी नायब तहसीलदार सुरेश गायकवाड (५०) यांना सरकारी टाटा सुमो वाहनातून कुडल येथे पाठविले. गायकवाड यांनीही परिस्थितीचे गांभीर्य न पाहता कडक शब्द उच्चारल्याने जमावाचा संताप वाढला. त्यातून गायकवाड यांनी आणलेल्या तहसीलदारांच्या गाडीला आग लावण्यात आली. आगीत संपूर्ण गाडीचे मोठे नुकसान झाले. या घटनेची माहिती सायंकाळपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाला ज्ञात नव्हती.

Story img Loader