Karuna Munde on Alimony Case: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात कौटुंबिक न्यायालयात गेलेल्या करुणा मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कौटुंबिक न्यायालयाने अंतरिम निकाल देत असताना तक्रारदार करुणा मुंडे यांना दरमहा १ लाख २५ हजार तर त्यांच्या मुलीला ७५ हजार रुपये असे एकूण दोन लाख रुपये देखभाल खर्च देण्याचा निकाल दिला आहे. दरम्यान हा देखभाल खर्च कमी असून मासिक १५ लाख रुपये देखभाल खर्च म्हणून द्यावा, अशी मागणी करत आता उच्च न्यायालयात जाणार असल्याचे करुणा मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच वाल्मिक कराडचा उल्लेख करत त्यांनी आपल्या मुलाबाबतही भाष्य केले.
प्रसारमाध्यमांशी बोलत असताना करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. यावेळी त्यांनी वाल्मिक कराडचाही उल्लेख केला. त्या म्हणाल्या, नोकराकडे ४ हजार कोटींची संपत्ती आढळून आली. पण मुंडेंचा एकुलता एक मुलगा २१ वर्षांचा असून त्याच्याकडे काहीच काम नाही. जनतेला मी हे सांगू इच्छिते की, मंत्र्याच्या मुलाकडे एक रुपयाचीही संपत्ती नाही. वाल्मिक कराडचा मुलगा कोट्यवधींच्या गाडीत फिरतो. पण आमच्या मुलाकडे एकही गाडी नाही. आमची मुलगी ट्रेनमधून फिरते.
धनंजय मुंडेंना सरकारमधील उच्चपदस्थ लोकांकडून अभय मिळाल्यामुळे त्यांनी माझ्यावर अन्याय केला, असाही आरोप करुणा मुंडे यांनी केला.
आता मला करुणा मुंडेच म्हणा…
टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना करुणा मुंडे म्हणाल्या की, यापुढे माझा उल्लेख करुणा शर्मा नाही तर करुणा धनंजय मुंडे असा करावा. कारण न्यायालयाने मला पहिल्या पत्नीचा दर्जा दिला आहे. त्यामुळे मी मुंडे नावासाठी जी लढाई लढत होती, ती यशस्वी झाली आहे.