बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबरला अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचा निकाल न्यायालयाने दिला आहे. यानंतर आता करुणा धनंजय मुंडे यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा उद्या सादर होईल असं म्हटलं आहे. अजित पवार यांनी तो राजीनामा लिहून घेतला आहे असाही दावा त्यांनी केला.
काय म्हणाल्या करुणा मुंडे?
मी ५ मार्चपासून उपोषण करणार होते. पण मला सूत्रांनी अशी माहिती दिली की तुम्ही उपोषणाला बसू नका. दोन दिवस आधीच अजित पवारांनी धनंजय मुंडेंकडून राजीनामा लिहून घेतला आहे. सोमवारी राजीनामा सादर होईल अशी माहिती करुणा धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. धनंजय मुंडे राजीनामा देत नव्हते. पण अजित पवारांनी राजीनामा लिहून घेतला आहे. उद्या अधिवेशन होणार आहे त्याआधी सगळ्यांसमोर राजीनामा दिल्याचं जाहीर होईल असं करुणा मुंडे यांनी म्हटलं आहे.
१०० टक्के राजीनामा होणार-करुणा मुंडे
१०० टक्के राजीनामा जाहीर केला जाईल. वाल्मिक कराडला व्हिआयपी ट्रीटमेंट मिळते आहे. मात्र सीबीआय आणि एसआयटी चौकशीनंतर काल निकाल आला आहे तो आपल्याला माहीत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड वाल्मिक कराडच आहे. मी देवेंद्र फडणवीस आणि ज्यांनी हा प्रश्न उचलून धरला त्यांचे आभार मानते असंही करुणा मुंडेंनी म्हटलं आहे. जी चौकशी पार पडली त्यात दूध का दूध आणि पानी का पानी हो गया. सत्याचा विजय झाला आणि वाल्मिक कराड हा पहिला आरोपी झाला आहे. तसंच कराडला वाचवण्याचा प्रयत्न होऊ नये म्हणून धनंजय मुंडेचा राजीनामा व्हायलाच पाहिजे असंही करुणा मुंडेंनी म्हटलं आहे.
मी देवेंद्र फडणवीस यांची भेट मागितली आहे
मी सतत राजीनामा मागत राहणार, माझ्याकडे पुरावे आहेत. मी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. मी त्यांची वेळ मागितली आहे मात्र त्यांनी ती अजून दिलेली नाही. जर धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला नाही तर मी उपोषणाला बसणार आहे. मीडियाच्या माध्यमातून जनतेच्या समोर जाणार आहे. तसंच हा मुद्दा उचलून धरा अशी मी विनंती करणार आहे. भ्रष्ट वृत्तीच्या लोकांना आपलल्याला संवपपायचं आहे त्यामुळे मी उपोषण करणार आहे विधानसभा सत्र सुरु होतं आहे. मात्र समाजात महिलांना तुरुंगात टाकलं जातं आहे, त्यांच्यावर हात उचलला जातो आहे. अगदी दोन वर्षांची मुलगीही सुरक्षित नाही. बलात्कार, अत्याचार तसंच खंडणी मागणे, लोकांची जमीन हिसकवाण्याचा काम हे सगळं वाढलं आहे. अजित पवारांनी आधीच राजीनामा घ्यायला हवा होता. पक्षाची प्रतिमा त्यामुळे खराब होते आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरण अतिशय गंभीर होतं. त्यांची हत्या अत्यंत क्रूर पद्धतीने करण्यात आली. त्या माणसाला पाणीही द्यायला प्यायला दिलं नाही आणि त्याची हत्या केली असाही आरोप करुणा मुंडेंनी केला आहे.